परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी काही दिवसांपूर्वी अवैध मार्गानं सुरु असलेल्या रॅपिडो वाहतुकीला रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या या कारवाईची जोरदार चर्चा झाली. परिवहन मंत्री स्वत:चं रिंगणात उतरल्यानं मुंुबईतील अवैध बाईक, टॅक्सी वाहतूक बंद होईल, असं मानलं जात होतं. पण, प्रत्यक्षात परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. परिवहन विभागानंच याची कबुली दिली असून संबंधितांवर पुन्हा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
काय दिला इशारा?
मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे, तशा परिवहन विभागाकडे तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत . त्या अनुषंगाने तातडीने तपास सुरू करण्यात आला असल्याचं परिवहन विभागानं स्पष्ट केलं. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स आणि बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान तर होतेच, शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो.
( नक्की वाचा : Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले )
मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 93 नुसार, कोणत्याही प्रवासी वाहतूक सेवेच्या संचालनासाठी आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, काही ॲप कंपन्या व चालक हे नियम धाब्यावर बसवत बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे उघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, क्षेत्रीय परिवहन कार्यालय (RTO), मुंबईच्या विशेष पथकांनी 20 युनिट्समार्फत एकाच वेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे संयुक्त कारवाई मोहीम राबवली. सदर मोहिमेमध्ये एकूण 123 बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील 78 बाईक टॅक्सी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध ॲप ऑपरेटरविरोधातही पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे परिवहन विभागानं स्पष्ट केलं आहे.