पुढे रस्ता सुरु आहे का? एवढं विचारलं म्हणून दोघांवर कोयत्यानेहल्ला, कल्याणमधील खळबळजनक घटना

कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गणेश शेवाळे नावाच्या तरुणाला अटक केली आहे. तर अक्षय गोगावले आणि विकी महानरवर या दोन तरुणांचा पोलीस शोध घेत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

पुढे रस्ता सुरु आहे का? फक्त इतकीच विचारणा केली म्हणून तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व येथे घडली आहे. धीरज जावळे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी गणेश शेवाळे नावाच्या तरुणाला अटक केली आहे. तर अक्षय गोगावले आणि विकी महानरवर या दोन तरुणांचा पोलीस शोध घेत आहे. 

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात राहणारे धीरज जावळे हे त्यांचे मित्र तेजस बराडे याच्यासोबत दुचाकीवरुन विजयनगर परिसरातून जात होता. एका ठिकाणी रस्त्यावर खोदकाम सुरु होते. या दोघांनी समोर येणाऱ्या एका दुचाकी चालकास विचारले की,  रस्ता पुढे सुरु आहे का?   धीरज याने हे विचारताच समोरच्या एका तरुणाने धीरजला शिवीगाळ केली.

(नक्की वाचा-  अंतरिम जामीन असूनही आरोपीला पोलिसांची बेदम मारहाण, आरोपीच्या हाताला झालं फ्रॅक्चर)

शिवी देणाऱ्या तरुणासोबत दुचाकीवर तीन जण होते. त्यावर धीरज याने विचारले की, आम्ही केवळ रस्ता पुढे सुरु आहे का? असे विचारले आहे. या कारणावरुन शिवी देण्याचे कारण काय? असे बोलताच त्या तिघांनी  धीरज आणि त्याचा मित्र तेजस याला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

मारहाण करणाऱ्यापैकी एकाने त्याच्या जवळचा धारदार कोयता काढून धीरजच्या डोक्यात वार केला. या घटनेत धीरज गंभीर जखमी झाला. हल्ला करणाऱ्यापैकी दोन जण पसार झाले. तर एकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जखमी धीरजवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा-  'तु मेलास तरी माझी मुलगी सुखी राहू शकते' सासऱ्यानं हिणवलं, जावयानं भयंकर पाऊल उचललं)

यावेळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी संदीप भालेराव यांनी सांगितले की, हा प्रकार रात्री घडला आहे. या प्रकरणी आरोपी गणेश शेवाळे याला अटक करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरु आहे. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल. केवळ रस्ता पुढे आहे का अशी विचारणा केल्यावरुन ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे.

Topics mentioned in this article