Dombivli News : तुलनेत स्वस्त मानल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरातील घरांच्या किमती आता मुंबईच्या दरांशी स्पर्धा करत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे, कल्याण-शिळफाटा रस्त्याजवळ असलेल्या 'पलावा सिटी' या निवासी प्रकल्पात 9,500 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची दोन आलिशान पेंटहाऊस तब्बल 16 कोटी रुपयांना विकली गेली आहेत. या व्यवहाराने डोंबिवलीच्या मालमत्ता बाजारात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
या विक्रीमधून प्रती स्क्वेअर फूट 16,400 रुपयांचा दर मिळाला आहे, जो या भागातील आतापर्यंतचा सर्वोच्च दर मानला जातो. मुंबईतील काही प्रीमियम भागांमध्ये याच दराने फ्लॅट विकले जातात, त्यामुळे डोंबिवलीचा रिअल इस्टेट मार्केट किती वेगाने वाढत आहे, हे स्पष्ट होते.
(नक्की वाचा- AI Photo Tool: 'Nano Banana' ट्रेंडच्या नादी लागू नका! तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा; VIDEO एकदा पाहाच)
नोंदणी झालेल्या कागदपत्रांनुसार, ही दोन्ही पेंटहाऊस 'लोढा हँगिंग गार्डन' इमारतीच्या 35 व्या मजल्यावर आहेत. या दोन्ही पेंटहाऊसेससाठी 10 गाड्यांच्या पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे. या व्यवहाराची नोंदणी 29 ऑगस्ट रोजी पूर्ण झाली असून त्यासाठी 54.6 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 60,000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे.
महारेराच्या (MahaRERA) संकेतस्थळावरील माहितीनुसार, 'लोढा हँगिंग गार्डन' ही इमारत सध्या निर्माणाधीन आहे आणि तिचे बांधकाम मार्च 2030 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मागील वर्षी याच 'लोढा पलावा' प्रकल्पात दोन फ्लॅट्स 7 कोटी रुपयांना विकले गेले होते. त्यावेळी प्रती स्क्वेअर फूट दर 14 ते 15 हजार रुपये होता, जो आता 16,400 रुपयांवर पोहोचला आहे.
या विक्रमी करारामुळे डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील मालमत्तांचे भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. यामुळे भविष्यात या भागात घरांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.