पुण्यातील ते जीवघेणे दोन तास; अतिरेकी धाडस, पावसाचा वाढता जोर अन्...!

पावसाळ्यात अतिरेकी धाडस जीवघेणं ठरू शकतं. भुशी डॅममध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वांनी मोठा धडा घेण्याची गरज आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पावसाळ्यात अतिरेकी धाडस जीवघेणं ठरू शकतं. भुशी डॅममध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वांनी मोठा धडा घेण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात सेल्फी घेणं किंवा उत्साहाच्या भरात पर्यटक जीव धोक्यात घालतात. असाच प्रकार पुण्यात घडला आहे.

पुण्यातील नदीपात्रात दोन तरुण अडकल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली होती. शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता हा प्रकार घडला होता. त्यानंतर तातडीने दलाकडून नवले, वारजे, सिंहगड व पीएमआरडीए नांदेड सिटी येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती. त्यानंतर घटनास्थळी पोहोचताच जवानांना नदीच्या पात्रात मध्यभागी असलेल्या बेटावर दोन तरुण अडकल्याचं दिसलं. त्याशिवाय पाण्याचा जोर वाढत होता. त्यामुळे जवानांनी तातडीने बचावकार्य करण्यास सुरुवात केली. नदीपात्राच्या दोन्ही बाजूने जवान मार्गस्थ होत होते. परंतु, पाण्याचा वाढता प्रवाह व किनारी खडकाळ भाग यामुळे आत जाताना अनेक अडथळे पार करीत बोट व रश्शी पाण्यात टाकत जवानांनी पुढे जात त्या बेटापर्यंत पोहोचले.

नक्की वाचा - लखपती दीदींसाठी मोदी आज जळगावात, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत अखेर पूर्णविराम!

गेल्या दोन तासांपासून तरुण बचावाच्या प्रतीक्षेत होते. दोघेही घाबरले होते. यावेळी जवानांनी त्यांना धीर देत त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर बोट व रश्शीचा वापर करीत सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची सुखरुप सुटका केली. यावेळी खडकवासला धरणातून होणारा विसर्ग काही वेळेकरिता कमी करण्यात आला होता. या सर्व कामगिरीत अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे स्वत: घटनास्थळी अधिकारी व जवानांना मार्गदर्शन करीत होते. तसेच जलसंपदा विभाग, महापालिका आपत्ती कक्ष, पोलीस विभाग, स्थानिक नागरिक यांची या कामगिरीत मोलाची मदत झाली.

दरम्यान पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. खडकवासला धरणातून  मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 31515 क्युसेक्स विसर्ग वाढवण्यात आला असून रात्री 11:00 वा. 35310 क्यूसेक्स करण्यात येत आहे.

Advertisement