विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना 'शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024' ही नवी मोहीम दिली आहे.
पुढील 41 दिवसात आचारसंहिता लागेल. त्यामुळे जोमाने काम करा, असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिले आहेत. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देशही विधानसभा संपर्कप्रमुखांना उद्धव ठाकरेंनी दिले. भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे.
विधानसभेसाठी इच्छुकांची नावे मागितली
लवकरच विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेऊन इच्छुक उमेदवारांसंदर्भात जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आदी पदाधिकारी यांच्यासोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या आघाडीची कारणे आणि जिथे पिछाडी झाली त्याबाबतची कारणे मागितली आहेत.
सोबत आपल्या विभागतील सर्वपक्षीय जिल्हा परिषद, नगरसेवक, पंचायत समितीतील सदस्य संख्या. तसेच प्रत्येक मतदारसंघातील जातीनिहाय मतदार संख्या याची माहिती विधानसभा संपर्कप्रमुखांकडून मागितली आहे.
इतर पक्षांची माहितीही मागवली
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत मविआतील असलेले घटक पक्ष काँग्रेस, शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड आणि अन्य संघटनांची आणि पक्षांची माहिती उद्धव ठाकरे यांनी मागवली आहे. याशिवाय पक्ष तळागाळात मजबूत होण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, वकील, डॉक्टर, शिक्षक, महिला बचत गटाच्या मुख्य प्रवर्तिका आणि अन्य प्रभावी व्यक्तींची माहिती मागितली आहे.