Raj Thackeray-Uddhav Thackeray: अनेक वर्षांच्या राजकीय मतभेदानंतर ठाकरे बंधूंमधील जवळीक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गणपती दर्शनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. या भेटीची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
दोन महिन्यात तिसरी भेट
राज आणि उद्धव ठाकरे बंधू काही दिवसांपूर्वी 'हिंदी सक्ती' विरोधात वरळी येथे झालेल्या एका जाहीर सभेत एकत्र आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, "हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है" असे विधान करत भविष्यातील संभाव्य राजकीय युतीचे संकेत दिले होते. यानंतर, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री'वर जाऊन त्यांची भेट घेतली होती. ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील संबंध सुधारत असल्याचे स्पष्ट झाले.
गणेशोत्सव ठाकरे बंधुंसाठी पुन्हा एकत्र येण्याचे एक महत्त्वपूर्ण निमित्त ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र लढलेल्या बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. भाजप-पुरस्कृत आणि शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारल्यामुळे ठाकरे गटाच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पराभवानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.
त्यामुळे, गणपती दर्शनाच्या निमित्ताने होणारी ही कौटुंबिक भेट केवळ एक धार्मिक सोहळा नसून, येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबईच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरू शकते. ही भेट आगामी महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांना एकत्र आणून मराठी मतांची ताकद पुन्हा एकदा वाढवू शकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.