निनाद करमरकर, उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये तीन वर्षीय चिमुकलीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याची संतापजनक घटना गुरुवारी समोर आली होती. ही हत्या मुलीच्या सख्या मामानेच केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी मुलीच्या मामाला बेड्या ठोकल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील प्रेमनगर टेकडी परिसरात मृत चिमुकली तिची आई आणि दोन बहिणींसह वास्तव्याला होती. सोमवारी घरात खेळता खेळता मामाने तिला एक फटका मारला. मात्र हा फटका जोरात बसल्याने मुलगी थेट ओट्यावर आदळली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या मुलीच्या मामाने तिचा मृतदेह लपवून ठेवला आणि बुधवारी मतदानाच्या दिवशी येऊन त्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी झाडीझुडपात हा मृतदेह टाकून जाळून टाकला.
(नक्की वाचा- फक्त 200 रूपयांची लाच घेणं भोवलं, थेट 6 वर्ष जेलमध्ये जावं लागलं)
गुरुवारी पोलिसांनी या मुलीची शोधाशोध सुरू केल्यानंतर मुलीचा मामा पत्नी आणि एका मित्रासह प्रेमनगर टेकडीवर पोहोचला आणि त्यानेही मुलीचा शोध घेण्याचं नाटक करत ज्या ठिकाणी या मुलीला जाळलं होतं, त्याच ठिकाणी रिक्षाचालक मित्राला मुद्दाम मुलीचा शोध घेण्यासाठी पाठवलं. तर स्वतः पत्नीसह दुसऱ्या भागात मुलीला शोधण्याचं नाटक करू लागला.
यादरम्यान रिक्षाचालक मित्राला मुलीचा मृतदेह आढळून आल्याने त्यानं याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली. मात्र हा सगळा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी रिक्षाचालक आणि मुलीच्या मामाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच मामाने आपला गुन्हा कबूल केला. मात्र आपण हत्येच्या उद्देशाने हे कृत्य केलं नसून अनावधानाने भाचीला जोरात फटका बसला आणि तिचं डोकं ओट्यावर आदळून तिचा मृत्यू झाला. यामुळे आपण घाबरलो आणि तिचा मृतदेह लपवला आणि नंतर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली.
(नक्की वाचा- पुण्यात आयटी अभियंत्याला 6 कोटीचा गंडा, त्याच्या बरोबर नक्की काय झालं?)
पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली असून शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. तसेच मुलीसोबत कोणतंही दुष्कृत्य झालं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.