
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आज मुंबई दौऱ्यादरम्यान त्यांच्या नियोजित कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. दिल्लीत होणारा पद्म पुरस्कार वितरण सोहळा आणि मुंबई-दिल्लीतील पावसाची परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबईतील नियोजित कार्यक्रम दौरा रद्द करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 142 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेलं अमित शाह यांचं व्याख्यान ही रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर ते माधवबाग येथील लक्ष्मी नारायण मंदिरात रवाना झाले. माधवबाग लक्ष्मी नारायण मंदिराला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी लक्ष्मी-नारायणाचं दर्शन घेतलं.
अमित शाह यानंतर मुंबई विद्यापीठात दीक्षांत समागृहात कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र त्यांचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार वितरण सोहळा मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात न होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी होणार आहे. येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिष्ठानला पुरस्कार प्रदान करुन अमित शाह दिल्लीला प्रयाण करतील, अशी माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या 142 व्या जयंतीनिमित्ताने अमित शाह मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात व्याख्यान करणार होते. येथे ते सावरकरांविषयी बोलणार होते. मात्र त्यांचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
नक्की वाचा - भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा, परिवहन मंत्र्यांना असे आदेश का दिले?
अमित शाहांना भाजप नेत्यांकडून तक्रार...
अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना 26 मेला रात्रीच्या सुमारास अजित पवारांनी सह्याद्री अतिथीगृहात अमित शाहांची भेट घेतली. समोर आलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह यांच्या नांदेड दौऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार हे भाजप आमदार तसेच पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना ताकद देण्याचे काम करत असल्याची नाराजी भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार आणि अमित शाहांच्या भेटीत याबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world