लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अवकाळी पावसाचा व्यत्यय आला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेली लावल्याने अनेक नेत्यांच्या सभा रद्द झाल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, सांगली याठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.
उद्धव ठाकरेंच्या जालन्यातील सभा रद्द
संभाजीनगर जिल्ह्यात दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. वेरूळ भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जालन्यात देखील रिमझिम पावसाला सुरु झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची सभा देखील रद्द झाली आहे. हेलिकॉप्टर उडवण्यास परवानगी दिली नसल्याने उद्धव ठाकरेंची जालन्यातील दौरा रद्द करण्यात आला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांची जालन्यातील सभा पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी देखील जोरदार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे सभास्थळी लावण्यात आलेल्या खुर्च्या पडल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेवर पावसाचे संकट पाहायला मिळत असून, असाच पाऊस सुरू राहिल्यास उद्धव ठाकरेंची संभाजीनगरमधील सभा देखील रद्द होऊ शकते.
पुण्यात देखील अवकाळी पावसाची हजेरी
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून उपनगरातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. पुण्यामध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ शहरी भागासह बिबेवाडी, कात्रज, कोंढवा, चंदननगर, वाघोली या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत पुण्यामध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र अवकाळी पावसामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र राज ठाकरे यांची येथे होणारी सभा रद्द होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का? अजित पवार गटाचा बडा नेता शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात)
अजित पवार-देंवेद्र फडणवीसांच्या सभेला अवकाळीचा फटका
पिंपरी चिंचवड अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शहरातील काही भागात कोसळला. अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरात आज शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोसरी येथील गाव जत्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहेत. या सभेला देखील अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा : ठाण्याचा गड कोण राखणार? ठाकरेंचा 'निष्ठावंत' की शिंदेंचा 'शिलेदार' )
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
कोल्हापुरातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला आहे. या पावसानंतर हवेत गारावा निर्माण झाला. दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शिये फाटा, पारगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. येत्या आठवड्याभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
सांगतील गारपीटीमुळे शेतीची नुकसान
सांगलीतही वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात गारपिटीसह पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाट, वादळी वारा आणि गारपीट झाली. जवळपास 20 मिनिटे हा गाराचा पाऊस झाला. गारपिटीमुळे परिसरातील आंबा, भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.