किशोर बेलसरे, नाशिक
नाशिकमध्ये निवडणुकीदरम्यान महायुतीचं टेन्शन वाढलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या व्यासपीठावर दिसल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ यांच्या भूमिकेमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसणार की अशी शक्यता निर्माण झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नरहरी झिरवळ दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचाराच्या बैठकीत उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. नरहरी झिरवळ यांचा प्रचार बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ आज दिंडोरी येथील तीसगाव या ठिकाणी मारुती मंदिराच्या कार्यक्रमाला आले होते. या ठिकाणी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांची सभा होती. त्यावेळी झिरवाळ यांना आमंत्रण दिल्याने ते थेट सभेत महाविकास आघाडीच्या मंचावर जाऊन बसले.
( नक्की वाचा- मोठा बातमी! अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर)
कोण आहेत नरहरी झिरवळ?
नरहरी झिरवळ हे दिंडोरी मतदारसंघातून तीन टर्म आमदार राहिले आहे. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. आपल्या मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. विधानसभेचे सध्या ते उपाध्यक्ष देखील आहेत.
नरहरी शिरवळ हे दिंडोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. याच ठिकाणी भास्कर भगरे हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवीत आहेत. याठिकाणी आधीपासूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मानणारा गट आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या विधानसभेला नरहरी झिरवाळ यांना भास्कर भगरे आणि श्रीराम शेटे यांची गरज पडू शकते. त्यामुळे झिरवळ यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
(नक्की वाचा - सभांचा धडाका! मोदी, राज, उद्धव ठाकरे आजचा दिवस गाजवणार)
भारती पवार या भाजपाच्या महायुतीच्या उमेदवार आहे. त्यामुळे युतीधर्म म्हणून त्यांना भारती पवार यांच्या सोबत राहावे लागत आहे. असं असलं तरी विधानसभा मतदारसंघात त्यांची ताकद कमी होऊ नये, असा देखील एक प्रश्न झिरवळ यांच्यासमोर असावा. त्यामुळेच झिरवळ महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असावेत, असं बोललं जात आहे. मात्र नरहरी झिरवळ याबाबत काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world