आकाश सावंत, प्रतिनिधी
Iran War Impact On Sealed Water Bottles : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या युद्धजन्य तणावाचे पडसाद आता हजारो किलोमीटर दूर असलेल्या बीड जिल्ह्यातही उमटताना दिसत आहेत.या तणावाचा परिणाम केवळ तेल आणि गॅसपुरता मर्यादित न राहता विविध उद्योगांवरही होत आहे.बीडमधील बाटलीबंद पाणी उद्योगालाही त्याचा फटका बसू लागला आहे. बीड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लिंबादेवी परिसरातील बाटलीबंद पाणी तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. कारण बाटलीबंद पाण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक बॉटल तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने क्रूड ऑइलच्या रिफायनरीमधून मिळतो.
परंतु, आंतरराष्ट्रीय तणावामुळे काही रिफायनरींचे कामकाज प्रभावित झाले असून त्याचा थेट परिणाम प्लास्टिकच्या पुरवठ्यावर झाला आहे.पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी प्लास्टिक बॉटल्स तयार करणाऱ्या कंपन्यांनीही त्यांचे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे.याचा थेट फटका बाटलीबंद पाणी तयार करून बाजारात पुरवठा करणाऱ्या उद्योजकांना बसत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या स्टॉकवर अनेक युनिट्स सुरू असले तरी परिस्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात जादाचे पैसे देऊन प्लास्टिक बॉटल्स खरेदी कराव्या लागणार,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
नक्की वाचा >> Hormuz War: होर्मुजमध्ये महायुद्ध! अमेरिकेनं घेतला आतापर्यंतचा सर्वात खतरनाक निर्णय, काय आहे यूएसए त्रिपोली?
काय म्हणाले उद्योजक?
या विषयी बोलताना उद्योजक प्रकाश कवठेकर यांनी म्हटलंय की,"सध्या ग्राहकांना मिळणाऱ्या 20 रुपयांच्या बाटलीबंद पाण्याच्या बॉटलचे दर पुढील काही दिवसांत 25 ते 30 रुपयांपर्यंत वाढू शकतात.”जर युद्धजन्य परिस्थिती आणखी तीव्र झाली,तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जागतिक घडामोडींचा परिणाम आता स्थानिक उद्योग आणि ग्राहकांच्या खिशावरही होताना दिसत आहे.