कोल्हापूरच्या प्रसिद्ध जैन मठातील हत्तीण महादेवी (माधुरी) हिचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवीची रवानगी 'वनतारा' उपक्रमामध्ये करण्यात आली होती. यानंतर कोल्हापूरमध्ये मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला होता. या घटनेमुळे स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे लक्षात आल्यानंतर, अनंत अंबानी यांच्या मार्गदर्शनाखाली वनताराने एक अभिनव आणि संवेदनशील मार्ग निवडला आहे. कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीसोबत असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, वनताराने एक उपाय सुचवला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात, खास करून कोल्हापूरजवळ, हत्तींसाठी देशातील पहिले अत्याधुनिक 'सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र' उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत म्हटले की, "वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे."
मुख्यमंत्र्यांनी X पोस्टमध्ये म्हटलंय की, "या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले."
सॅटेलाईट पुनर्वसन केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये:
हायड्रोथेरपी तलाव आणि पोहण्यासाठी जागा
लेझर थेरपीसाठी खास कक्ष
24x7 पशुवैद्यकीय सुविधा
सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरणात मुक्त वावर
गादीसारखी मऊ जमीन आणि सॉफ्ट सँड माऊंड्स
हे केंद्र केवळ महादेवीसाठीच नव्हे, तर भविष्यात गरज पडल्यास इतर हत्तींसाठीही उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. हे केंद्र महाराष्ट्र शासन आणि जैन मठ यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करून विकसित केले जाईल. हे केंद्र कोठे उभारले जाईल, याबाबत अंतिम निर्णय वनतारा, जैन मठ आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात चर्चा करून घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. या उपक्रमामुळे भारतातील प्राणी कल्याण आणि पुनर्वसनासाठी एक नवा आदर्श निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.