Vasai News: खाकी डागाळली! लाच घेऊन पोलिसांनीच आरोपीला पळवले; पैसे घेण्याची पद्धत पाहून सारेच थक्क झाले

Vasai News: वसई न्यायालयाच्या आवारातून एका हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला लाच घेऊन पळवून लावण्यास मदत केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्र पोलीस दलाची मान खाली घालणारी आणि 'खाकी' वर्दीची प्रतिमा डागाळणारी एक अत्यंत धक्कादायक घटना वसईत समोर आली आहे. वसई न्यायालयाच्या आवारातून एका हत्या प्रकरणातील आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी स्वतः वसई पोलिसांनीच आपल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे. पैशांच्या हव्यासापोटी या पोलिसांनी थेट डिजिटल पेमेंटचा वापर करून लाच स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस हवालदार एकनाथ तळपदे, प्रशांत राठोड आणि वसीम शेख यांचा समावेश आहे.

डिजिटल लाचखोरी, 5-5 हजारांचे घेतले हप्ते

पोलीस तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे. पोलिसांनी फरार होण्यास मदत करण्यासाठी आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांकडून तब्बल 45 हजार रुपयांची लाच घेतली होती. ही लाच रोख स्वरूपात न घेता गुगल पे (Gpay) द्वारे 5-5 हजार रुपयांचे हप्ते करून ट्रान्सफर करण्यात आली होती.

Advertisement

(नक्की वाचा-  LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)

असा रचला पळून जाण्याचा कट

न्यायालयाच्या पिंजरा गाडीजवळ आरोपीला आणल्यानंतर, लाचखोर पोलिसांनी आरोपी विनोद सोनी याच्या हातातील बेड्या जाणीवपूर्वक सैल केल्या. यानंतर आरोपीने लघुशंकेचा बहाणा केला आणि पोलिसांनी त्याला पळून जाण्याची पूर्ण संधी दिली. या कटामध्ये आरोपीला पूर्ण साथ देणारी त्याची पत्नी साक्षी सोनी आणि मुलगा अतुल सोनी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

16 वर्षांपूर्वीच्या मर्डर मिस्ट्रीचा आरोपी

या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड संताप व्यक्त होत आहे, कारण क्राईम ब्रांच युनिट 3 च्या पथकाने तब्बल 16 वर्षांपूर्वीच्या एका क्लिष्ट मर्डर केसचा छडा लावून या आरोपीला मोठ्या शिताफीने मध्यप्रदेशातून अटक केली होती.

(नक्की वाचा-  Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )

काय होती घटना?

16 वर्षांपूर्वी विनोद जयसवाल नावाच्या एका व्यक्तीची दोरीने हातपाय बांधून आणि गळा आवळून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. क्राईम ब्रांचच्या पथकाने सलग सहा महिने अहोरात्र मेहनत घेऊन या फरार खुन्याला गजाआड केले होते. मात्र, वसई न्यायालयाच्या आवारात कर्तव्यावर असलेल्या या तीन लाचखोर कर्मचाऱ्यांनी अवघ्या 45 हजार रुपयांसाठी त्याला सोडून दिले. आता न्यायालयाच्या आवारातून फरार झालेल्या या हत्येच्या आरोपीला पुन्हा पकडण्यासाठी पोलिसांची मोठी फौज आणि पथके वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहेत.
 

Topics mentioned in this article