Vasai Crime News: वसईच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरवली गावाजवळील शेतात 21 मार्च रोजी एका 23 वर्षीय महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना क्राईम ब्रांच युनिट-3 ने या हत्येचा छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या पतीवर पत्नीने विश्वास ठेवला, त्यानेच मित्राच्या मदतीने तिचा काटा काढल्याचे समोर आले आहे.
मृताची ओळख आणि आरोपींची नावे
हत्या झालेल्या महिलेचे नाव मधुबाला ऊर्फ प्रियाकुमारी (वय 23) असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती रोशन रामजग यादव (वय 26) आणि त्याचा मित्र भानुप्रताप विजय बहादूर यादव (वय 30) यांना अटक केली आहे. आरोपी रोशन हा नालासोपारा परिसरातील रहिवासी आहे.
(नक्की वाचा- Exclusive: अशोक खरात प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती; नाशिकचे नामांकित डॉक्टर रडारवर, कारण...)
500 सीसीटीव्ही आणि एका दुचाकीचा माग
या गुन्ह्याचा कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना पोलिसांनी 500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तपासादरम्यान घटनास्थळाजवळ एक संशयित दुचाकी वारंवार दिसून आली. या दुचाकीच्या क्रमांकावरून आणि मोबाईल सीडीआर (CDR) च्या मदतीने पोलिसांनी आरोपी रोशन यादव याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच रोशनने गुन्ह्याची कबुली दिली.
हत्येचा भयानक कट
आरोपी रोशनला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणातून त्याने तिचा खून करण्याचा कट रचला. आरोपीने पत्नीला मुद्दाम उत्तर प्रदेशातून नालासोपाऱ्यात आणले. 19 मार्चच्या रात्री त्याने पत्नीला जेवणातून किंवा पेयातून गुंगीचे औषध दिले. पत्नी शुद्धीत नसताना त्याने मित्र भानुप्रतापच्या मदतीने तिला शिरवली परिसरातील निर्जन शेतात नेले आणि तिथे तिचा गळा चिरून निर्घृण हत्या केली.
(नक्की वाचा- Crime News: बीड हादरलं! प्रेम प्रकरणातून तरुणाला झाडाला बांधून मारहाण; त्यानंतर जे घडलं...)
आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केला होता, मात्र एका दुचाकीच्या फुटेजने त्यांचा पर्दाफाश केला," अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.