जाहिरात

Crime News: बीड हादरलं! प्रेम प्रकरणातून तरुणाला झाडाला बांधून मारहाण; त्यानंतर जे घडलं...

Beed Crime News: बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील 23 वर्षीय तरुण ज्ञानेश्वर कोकाटे याने प्रेम प्रकरणातून झालेल्या बेदम मारहाणीला कंटाळून आत्महत्या केली आहे.

Crime News: बीड हादरलं! प्रेम प्रकरणातून तरुणाला झाडाला बांधून मारहाण; त्यानंतर जे घडलं...

आकाश सावंत, बीड

Beed News: प्रेम प्रकरणाच्या वादातून एका 23 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरात घडली आहे. ज्ञानेश्वर कोकाटे असे मृत तरुणाचे नाव असून, मरण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मारहाण करणाऱ्यांच्या क्रूरतेचा पाढा वाचला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर कोकाटे याचे शेजारच्या गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरला गाठले. आरोपींनी ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतले. त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेत त्याला एका झाडाला बांधून बेदम मारहाण केली. मारहाण करताना त्याचे व्हिडिओ देखील बनवण्यात आले होते. इतकेच नाही तर त्याला गावात 'चोर' म्हणून बदनाम करण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.

(नक्की वाचा-  Solapur News: करमाळ्यातून अचानक गायब होत आहेत मुली-महिला; तालुक्यात भीतीचं वातावरण!)

"मला खूप मारले..."

या अपमानास्पद वागणुकीमुळे आणि शारीरिक जाचामुळे ज्ञानेश्वर प्रचंड मानसिक तणावात होता. अखेर त्याने धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चरच्या दुकानात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली. त्यात त्याने लिहिलं की, मला खूप मारले, गावात चोरटा म्हणून बदनाम केले. तुला जिवंत मारून टाकू अशा धमक्या दिल्या. सुसाईड नोटमध्ये ज्ञानेश्वरने आरोपींच्या नावांचा आणि दिलेल्या धमक्यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

(नक्की वाचा-  Actor Vijay Net Worth: निवडणुकीच्या मैदानात 'थलपथी'चा डंका! संपत्तीचा आकडा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले)

आईची न्यायासाठी आर्त हाक

"माझ्या मुलाला बोलावून घेऊन झाडाला बांधून मारले, त्याचे व्हिडिओ काढले. मारहाण करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे," अशी मागणी मृत ज्ञानेश्वरची आई कौशल्या कोकाटे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नेकनूर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुसाईड नोट आणि आईच्या जबाबाच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com