वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढते नागरीकरण आणि त्यासोबत येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पदभार स्वीकारताच कंबर कसली आहे. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी चार महत्त्वाच्या विशेष समित्यांची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या आगामी प्रकल्पांना गती मिळण्यासोबतच तांत्रिक अचूकताही वाढणार आहे.
कोणत्या आहेत या 4 विशेष समित्या?
- अंदाजपत्रक समिती: प्रकल्पांच्या खर्चाचे अचूक नियोजन करण्यासाठी.
- निविदा समिती: कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी.
- शहर सौंदर्यीकरण समिती: शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि हरित पट्टे विकसित करण्यासाठी.
- शहरी वाहतूक सुधारणा समिती: वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी.
(नक्की वाचा- Nagpur School Holiday: नागपुरात शनिवारी सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर; कुणा-कुणाला सुट्टी लागू?)
'मान्सून' सज्जतेचाही घेतला आढावा
पदभार हाती घेताच आयुक्तांनी केवळ दीर्घकालीन नियोजनच नाही, तर तातडीच्या कामांनाही प्राधान्य दिले आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील मान्सूनपूर्व कामांचा, नालेसफाईचा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला आहे. "पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे," असे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत.
(नक्की वाचा- Lok Sabha News: लोकसभेत महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक फेटाळले; इतर दोन विधेयकांचं काय झालं?)
पारदर्शकतेवर भर
वसई-विरारमध्ये अनेकदा विकासकामांच्या निविदा आणि अंदाजपत्रकावरून आरोप-प्रत्यारोप होत असतात. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी या समित्यांचे विशेष लक्ष राहणार आहे. "शहराचा विकास केवळ वेगानेच नाही, तर पारदर्शक पद्धतीने आणि नियोजनबद्ध झाला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे," असे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world