जाहिरात

Vasai-Virar Rain : घरात पाणी, ना वीज, ना नेटवर्क; विरार-वसई पाण्याखाली का गेलं? 5 दिवसांनंतर कशी आहे स्थिती?

गेला आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार आणि नालासोपाऱ्यातल्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Vasai-Virar Rain : घरात पाणी, ना वीज, ना नेटवर्क; विरार-वसई पाण्याखाली का गेलं? 5 दिवसांनंतर कशी आहे स्थिती?

गेला आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार आणि नालासोपाऱ्यातल्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पण गंभीर बाब म्हणजे पावसाचा जोर ओसरूनही अगदी पाचव्या दिवशीही या शहरांमधलं पाणी ओसरलेलं नाही. त्यामुळे वसई विरारकरांचं प्रचंड आर्थिक नुकसान तर झालंच आहे, पण रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसलाय. वसई विरार आणि नालासोपाऱ्यातली आजची स्थिती काय? 

वसई-विरारमध्ये पूरस्थिती...
 

तुम्ही जी दृश्य पाहताय, ती काही एखाद्या तळ्याकाठी किंवा नदीकाठी वसलेली लेकसाईड किंवा रिव्हरसाईड टाऊनशीप नाहीए..तर ही दृश्य आहेत तब्बल पाच दिवसांपासून पाण्यात बुडालेल्या वसई आणि विरार आणि नालासोपाऱ्यातल्या बहुतांश परिसरांची.. सलग पाच दिवसांच्या पावसाने मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई-विरारमधील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली. पुरामुळे अनेकांच्या घरातला वीज पुरवठा बंद आहे. एवढंच काय तर अनेक भागांत पिण्याचं पाणीही मिळेनासं झालंय. हळूहळू वसई-विरारमधील परिस्थिती पूर्वपदावर येतेय.

पण अजूनही विरारमधला एम बी एस्टेट परिसर, रश्मी नगर, तिरुपती नगर, आणि युनिटेक सोसायटी परिसरात पाणी कायम आहे. तर नालासोपाऱ्यात स्टेशनजवळचा पूर्व भाग, संतोषभुवन, बिलालपाडा, धानिवबाग, पेल्हार आणि रिचर्ड कंपाऊंड परिसर अजूनही पाण्याखाली आहे. तिकडे वसईमधल्या बहुतांश परिसरातलं पाणी ओसरलंय. 

वसई-विरार पाण्याखाली का गेलं? 

ज्या भागातलं पाणी ओसरलंय, तिथले लोक आता जीवनावश्यक वस्तू, किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांच्या चकरा मारतायत, पण अनेक दुकांनांमध्येही पाणी शिरल्याने वाणसामान मिळणं मुश्किल झालंय. पेट्रोल पंपांवरही लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. वसई विरार या परिसरात पाणी साचणं ही काही यंदा पहिल्यांदाच घडलेली घटना नाहीए. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात अशाच पद्धतीने पाणी साठत असून या परिसरात वेगाने झालेलं नागरीकरण हे त्याचं प्रमुख कारण आहे.   

वसई विरार शहर 380 चौरस किमी क्षेत्रात विस्तारलंय. हा संपूर्ण भाग समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे. पश्चिमेकडे समुद्र आणि पूर्वेकडे तुंगारेश्वरसारखा डोंगराळ भाग आहे. मुसळधार पाऊस आणि समुद्राला भरती एकाच वेळी आल्यास शहरात पाणी साठून राहतं. तसंच वाढतं औद्योगिकरण आणि स्वस्त घरांमुळे इथली लोकसंख्याही झपाट्याने वाढली. पण ही शहरं वाढत असताना त्याचं नीट प्लानिंगही झालेलं नाही. नाल्यांवर अतिक्रमण करून ते बुजवण्यात आले. तसंच रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना बांधकामं वाढल्याने रेल्वेसेवाही कोलमडते. 

वसई -विरारमधली पाणी तुंबण्याची समस्या लक्षात घेता, निरी आणि आयआयटीसारख्या संस्थांनी अभ्यासपूर्ण अहवाल सादर केले. त्याआधारे होल्डींग पाँड विकसित करण्यासाठी 400 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र हा प्रस्ताव सध्या थंड बस्त्यात पडून आहे. आता गरज आहे, ती या प्रस्तावावर गंभीर विचार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची. अन्यथा ही पूरस्थिती भविष्यात आणखी गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com