मुंबईतून मराठी माणूस हरवत चालला आहे, अशी ओरड अनेक वर्षांपासून सुरु आहे. मराठी माणूस मुंबईत कल्याण, डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई येथे स्थायिक होत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. मुंबईतून मराठी माणसाला जावं लागत आहे, याचं प्रमुख कारण म्हणजे मुंबईतील घरांच्या गगनाला भिडलेल्या किंमती. याशिवाय अनेक बिल्डर्स आणि रहिवाशांच्या आडमुठेपणामुळे देखील आर्थिक परिस्थिती असून मराठी माणसाला अनेक ठिकाणी घरे घेता येत नाहीत.
मात्र मराठी मुंबईकरांना आता दिलासा मिळू शकतो. कारण मुंबईत मराठी माणसांना घरासाठी आरक्षण द्या, अशा पद्धतीची मागणी विलेपार्ले इथल्या एका संस्थेने केली आहे. तसेच हा मुद्दा आमदारांनी अधिवेशानात देखील उपस्थित करावा, अशी मागणीही या संस्थेने केली आहे.
मागच्याच वर्षी मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला एका सोसायटीमध्ये मिळालेली वागणूक संतापजनक होती. ती मराठी असल्या कारणाने तिला जागा नाकारण्यात आली होती. या घटनेनंतर मराठी माणसांना कसं मुंबईत घर नाकारलं जातं त्याची अनेक उदाहरणे समोर आली होती. त्यातच दिवसेंदिवस मुंबईत मराठी टक्का कमी होत चालला असल्याने मुंबईत मराठी माणसांना घरासाठी आरक्षण द्या, अशी मागणी विलेपार्ले येथील 'पंचम' या संस्थेने केली आहे.
पंचम संस्थेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी म्हटलं की, मुंबईत मराठी माणसाला घरासाठी आरक्षण द्या, या मागणीला घेऊन या संस्थेमार्फत मुंबईतील सर्व आमदारांना पत्र पाठवण्यात येणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा चर्चेसाठी घेण्यात यावा अशी मागणी देखील आमच्याकडून करण्यात येणार आहे.
पंचम संस्थेने केलेल्या सूचना?
- जुन्या इमारतींमधील घरे मराठी माणसांना विकण्यासाठी अमराठी लोक तयार होत नाहीत. दुसरीकडे मोठ्या घरांचा देखभाल खर्च (मेंन्टेनन्स) मराठी माणसाला परवडत नाही. अशा अनेक समस्यांमुळे मुंबईतील मराठी टक्का घसरत आहे.
- अमराठी सोसायट्यांमघ्ये अरेरावी व कोणतीही गोष्ट आर्थिक ताकदीवर झुकवण्याच्या वृत्तीने मराठी माणसांच्या तिथे घर घेता येत नाही. त्यामुळे नव्या इमारतीत घरांचे बुकिंग सुरू झाल्यानंतर एका वर्षांपर्यंत मराठी माणसांसाठी घरांचे 50 टक्के आरक्षण ठेवावे.
- वर्षभरात या घरांची मराठी माणसांकडून खरेदी न झाल्यास बिल्डर ते कुणालाही विकू शकतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या मराठी माणसाचं मुंबई घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, अशी सूचना पंचम संस्थेने केली आहे.
जाती,धर्म ,भाषा, शाकाहारी, मांसाहारी या मुद्द्यावरून मुंबईत आणि मुंबईसह इतर शहरात घर नाकारल्याच्या घटना सातत्याने चर्चेत येत असतात. मात्र याविषयी ठोस कुठलेही निर्णय होताना अद्याप तरी पाहायला मिळाले नाहीत. एखादी घटना समोर आल्यानंतर त्यावर तात्पुरत्या प्रतिक्रिया उमटतात. मात्र त्यानंतर तो मुद्दा पुन्हा शांत होऊन जातो, असं पंचम संस्थेचे सचिव, तेजस गोखले यांनी म्हटलं. पंचम संस्थेने हाती घेतलेला हा उपक्रम किती यशस्वी होतो आणि किती मराठी माणसांचं मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण होतं, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.