- विरारमध्ये मद्याच्या नशेत एका तरुणाने विषारी साप पकडून त्याच्यासोबत स्टंट केला
- या स्टंटदरम्यान सापाने त्याला चावा घेतल्यामुळे त्याचा तिथेच मृत्यू झाला
- मृत तरुणाचे नाव राजू चंदू बरड असून त्याचे वय चाळीस वर्षे होते
मनोज सातवी
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कुणी ही काही करतं. आपण काय करत आहोत याचं भान ही त्यांना राहत नाही. त्यामुळे अशा घटना कधी कधी जास्त धोकादायक बनतात. तशीच एक घटना विरारमध्ये झाल्याचं समोर आली आहे. एक बेफिकीर स्टंट थेट जीवावर बेतला आहे. एका तरुणाने विषारी साप पकडला. त्यानंतर तो त्या सापा बरोबर चाळे करू लागला. कधी गळ्यात टाकत होता तर कधी त्याला चावा घेत होता. त्याच वेळी सापानेही त्याला चावा घेतला. त्यामुळे त्या तरुणाचा तिथेच मृत्यू झाला. याचा व्हिडीओ ही सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सापाला गळ्यात घालून ‘हिरोगिरी' दाखवणाऱ्या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव राजू चंदू बरड असे आहे. त्याचे वय 40 वर्ष होते. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विरार पश्चिमेच्या नवापूर परिसरात साप दिसताच, राजूने मद्याच्या नशेत त्याला पकडले. एवढ्यावर न थांबता त्याने साप गळ्यात घेऊन त्याच्यासोबत मस्ती करण्यास सुरुवात केली. उपस्थितांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. दारूच्या नशेत आपण काय करत आहोत हे राजूला समजत नव्हते. त्याला आपण काही तरी भारी करत आहोत असं त्याला वाटले.
त्या हा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र या ‘स्टंटबाजी'चा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला. सापाची छेड काढल्याने तरुणाच्या हाताला सापाने दंश केला. त्यामुळे त्याची नशा एका झटक्यात उतरली. साप चावल्याने राजूची प्रकृती बिघडली. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने खारोडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाणे येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.