केंद्र सरकार ‘वक्फ बोर्ड अधिनियम- 1995' या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक सादर करण्याच्या तयारीत आहे. नवं विधेयक मान्य झाल्यास वक्फ बोर्डाला मोठा धक्का बसू शकतो. या सुधारणा विधेयकावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्येही दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहे.
महायुती सरकारमध्ये वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाबाबत एकवाक्यता नसल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत वक्फ सुधारणा विधेयकाचं समर्थन केलं आहे. त्याचवेळी महायुतीतील दुसरा घटक पक्ष अजित पवार गटाने या विधेयकाबद्दल सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयकावरून महायुतीत दोन गट पडले आहे.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
श्रीकांत शिंदेंनी वक्फ सुधारणा विधेयकाचं समर्थन केलं आहे. ते संसदेत म्हणाले, माझ्या मते या नव्या विधेयकामुळे पारदर्शीपणा राहिलं. विरोधकांनी यापूर्वी संविधानाच्या नावाखाली भ्रम पसरवण्याचं काम केलं आहे. या विधेयकात मुस्लीम महिलांना नेतृत्व मिळेल. विरोधकांनी तीन तलाक पद्धत, 370 हटवतानाही विरोध केला होता. वक्फ बोर्ड देशातील तिसरी सर्वाधिक जमीन असलेली संस्था आहे. पूर्ण देशात या जमिनींवरून 85 हजारांपेक्षा जास्त प्रकरणं सुरू आहेत. विरोधक मतपेटी खूश करण्यासाठी या बिलाचा विरोध करीत आहेत.
नक्की वाचा - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती? RSS-भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
धुळ्याच्या बैठकीत काय म्हणाले अजित पवार?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्फ सुधारक विधेयकाविषयी आपली भूमिका मांडली. धुळ्यातील जनसन्मान यात्रेदरम्यान ते म्हणाले, आम्ही अल्पसंख्यांक समाजाशी संबंधित विषय घेऊन केंद्रात जाऊ. याशिवाय वक्फ बोर्डाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. केंद्र सरकारने वक्फ सुधारक विधेयक आणलेलं असताना अजित पवारांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वक्फ सुधारक विधेयकावरुन महायुतीत दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणुका होणार आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि खासदार उदयनराजे भोसले हे लोकसभेत गेल्यानंतर राज्यसभेच्या दोन्ही जागा रिकाम्या झाल्या आहेत. या दोन जागांमधील एक जागा भाजप आणि दुसरी जागा अजित पवारांना मिळेल. अशाच अल्पसंख्यांक मतपेटी आपल्याकडे वळवून घेण्यासाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्यांक चेहऱ्याला संधी देऊ शकते.