Kalyan Dombivli Water Issue : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या मुद्द्यावर महासभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत नागरिकांच्या अडचणींचा पाढा वाचला.“ढगाला लागली कळ,पाणी थेंब थेंब गळं” हे शब्द उच्चारत शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक अर्जुन पाटील यांनी पाणीटंचाईची तीव्रता मांडली.त्यांनी आरोप केला की केडीएमसीचे काही अधिकारी-कर्मचारी सोसायट्यांकडून दरमहा 7 ते 8 हजार रुपये घेऊन पाणीपुरवठा करतात. परिणामी सामान्य नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात.एका कुटुंबाला केवळ स्वयंपाकासाठी दररोज 100 रुपयांत चार हांडे पाणी विकत घ्यावे लागत असल्याची गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणली.
नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम
दुसरीकडे, काँग्रेस नगरसेविका समीना शेख पाण्याच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित करत संतप्त सवाल उपस्थित केला. “जे पाणी येत आहे ते गढूळ आहे,ते पिण्यास योग्य नाही.मग नागरिकांनी काय करायचं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.महासभेत त्यांनी गढूळ पाण्याची बाटली दाखवत प्रशासनाचे लक्ष वेधले आणि नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले.दरम्यान,काही दिवसांपूर्वी महापौर हर्षाली हवे चौधरी यांनी जलशुद्धीकरण केंद्राचा अचानक दौरा करून पाणीपुरवठ्याची पाहणी केली होती.अवैध जोडण्या करून पाणी वळवले जात असल्याच्या तक्रारीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली होती.
नक्की वाचा >> "हिंदू असल्याचा अभिमान..", नमाज पठणावरून ट्रोल झालेल्या नमिता थापर म्हणाल्या, "आय डोंट केअर..", Video व्हायरल
अनेक भागात गढूळ पाणीपुरवठा
महासभेत शिवसेना नगरसेवक विकास म्हात्रे यांनी इशारा देत सांगितले की,पाण्याचा प्रश्न लवकर सोडवला नाही तर पुढील सभेत आंदोलन छेडले जाईल.कल्याण पश्चिमेतील अनेक भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,अशी तक्रारही यावेळी करण्यात आली.एकीकडे पाणीटंचाई,तर दुसरीकडे दूषित पाणीपुरवठा या दुहेरी संकटामुळे केडीएमसी क्षेत्रातील नागरिक हैराण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी,अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.