शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. वरळीतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तींच प्रतिज्ञापत्र देखील निवडणूक आयोगाला सादर केलं आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, आदित्य ठाकरेंकडे 15 कोटींहून अधिकची चल संपत्ती आहे. तर 6 कोटी 4 लाख रुपयांची अचल संपत्ती आहे.
आदित्य ठाकरे यांनी त्यांचा व्यवसाय सामाजिक आणि राजकीय सेवा दिला आहे. उत्पन्नाचा स्त्रोत हा व्याज, भाडे, डिव्हिडंट आणि पगार असा केला आहे. मात्र ते नोकरी कुठे करतात याचा उल्लेख नाही. आदित्य ठाकरेंनी 43 लाखांचे कर्जही घेतल्याचेही प्रतज्ञापत्रात दाखवले आहे.
आदित्य ठाकरेंची संपत्ती
- आदित्य ठाकरेंच्या बँकेतील रक्कम आणि ठेवी - 2 कोटी 81 लाख रुपये
- हिंदू अविभक्त कुटुंबाचा भाग म्हणून असलेल्या बँक खात्यात 15 लाख 97 हजार रुपये
- श्री अॅस्टर सिलिक्टेस लिमिटेड या डिलिस्टेड कंपनीचे 50 हजार शेअर असून ते 5 लाखांना घेतले होते ज्याची किंमत 30 सप्टेंबर 2024 रोजी 70 हजार रुपये झाली होती.
- ICICI डीप डिस्काऊंट बॉण्ड - 5500 रुपयांना खरेदी, 30 सप्टेंबर 2024 रोजीची किंमत 50 हजार रुपये
- म्युच्युअल फंडातील एकूण रक्कम 10 कोटी 13 लाख रुपये
- म्युच्युअल फंड आणि शेअरमधील एकूण गुंतवणूक - 10 कोटी 14 लाख रुपये
हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक
GTL लिमिटेडचे दीड कोटी रुपयांचे 69 हजारांपेक्षा अधिक शेअर्स घेतले होते. या शेअर्सची आजची किंमत फक्त 8 लाख 93 हजार इतकी झाली आहे. 2003 साली या कुटुंबाने मारूती सुझुकी कंपनीचे 500 शेअर्स घेतले होते. शेअर्सची खरेदी किंमत 62 हजार रुपये इतकी होती, 20 वर्षांनंतर या शेअर्सची किंमत 66 लाख 14 हजार रुपये झाली आहे. ठाकरे कुटुंबाला म्युस कारा आणि सनग्रेस मफतलाल लिमिटेड कंपनीचे 57 हजार शेअर्स शून्य रुपयाला मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. या शेअर्सची किंमत 30 सप्टेंबर रोजी 57 हजार रुपये इतकी होती.
आदित्य ठाकरेंकडे दागिने किती?
आदित्य ठाकरेंकडे सोनं आणि हिऱ्याचं ब्रेसलेट आहे. ज्याची किंमत 3 लाख 90 हजार रुपये. या ब्रेसलेटमध्ये 535 हिरे आहेत. दोन हिरेजडीत सोन्याच्या बांगड्या आहेत ज्याची किंमत 47 लाख 42 हजार रुपये आहे. याशिवाय 24 कॅरेट सोन्याची 1 किलो 466 ग्रॅमची नाणी आणि बिस्किट आहेत. त्याची किंमत 1 कोटी 9 लाख 95 हजार आहे. याव्यतिरिक्त 239 ग्रॅमचा रत्नजडीत हार सुद्धा आदित्य ठाकरेंच्या मालकीचा आहे. त्याची किंमत 1 कोटी 33 लाख रुपये आहे. आदित्य ठाकरेंकडे असलेल्या एकूण सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत 1 कोटी 91 लाख रुपये दाखवण्यात आली आहे. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून ठाकरे कुटुंबाकडे सोनं आणि चांदीचे सुमारे 84 लाख 3 हजाराचे दागिने आहेत.
आदित्य ठाकरेंनी कर्जत येथे 10 जानेवारी 2020 मध्ये एक जागा विकत घेतली होती. या जागेची किंमत नमूद करण्यात आलेली नाही. ही जागा आदित्य यांनी त्यांची आजी माधवी पाटणकर यांना 3 मार्च 2021 रोजी गिफ्ट डीडच्या माध्यमातून नावे केली. ही जमीन कर्जतच्या भिसेगांव इथे असून या जागेचे क्षेत्रफळ जवळपास 171 स्क्वेअर मीटर इतकी आहे. आदित्या ठाकरेंकडे एक बीएमडब्लू कार देखील आहे.