यंदा ऑक्टोबर हिटचा तडाखा आणि भरपूर पाऊस पडल्यामुळे जमिनीसह (Maharashtra Rain) वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे पाण्याचे ढगात रूपांतर होऊन राज्यातील विविध भागांत दररोज रात्री धो धो पाऊस कोसळत आहे. यंदा दिवाळीपर्यंत म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस सुरू राहील. त्यामुळे थंडीचे आगमन किंचित लांबणार असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
यंदा 26 सप्टेंबरपासून मोठा पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काही दिवसातच पाऊस थांबला आणि लगेच कडक उन्हाचे चटके जाणवू लागले. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने जमीन अजूनही खूप ओली आहे. तसेच बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात सतत बाष्पयुक्त वारे वाहत आहेत.
नक्की वाचा - निवडणूक काळात Whatsapp वापरताना 'ही' काळजी घ्या अन्यथा होईल कारवाई, अॅडमिनवर मोठी जबाबदारी
त्यामुळे जमिनीसह वातावरणातील बाष्पापासून दिवसाच्या कडक उन्हामुळे ढगांची निर्मिती वेगाने होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी धो धो पाऊस पडत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा स्थानिक परिणाम असून त्या त्या गावातील बाष्पाच्या प्रमाणानुसार हा पाऊस कमी किंवा जास्त पडतो आहे.
मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस परतीचा मान्सून राज्यातूनच नव्हे, तर देशातून 15 ऑक्टोबर रोजीच गेला. मग हा अवकाळी पाऊस का पडतोय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे कारण हवामानशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या ऑक्टोबर हिटचा चटका आहेच, कमाल तापमान 31 ते 25 अंशांवर जात आहे. त्यामुळे ओल्या जमिनीतील बाष्प आणि वातावरणातील बाष्प यांच्यामुळे ढगांची निर्मिती होते.