सागर कुलकर्णी: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. एकीकडे विविध खात्यांवरुन सुरु असलेली रस्सीखेच, एकनाथ शिदेंची नाराजी, अजित पवारांचा हट्ट या सर्वांवर तोडगा काढत महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री स्वतःकडे ठेवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. जाणून घ्या, या खाते वाटपातील काही ठळक वैशिष्टे...
- CM फडणवीसांची ताकद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा गृहमंत्रालय तसेच सामान्य प्रशासन विधी व न्याय खातं स्वतःकडे ठेवत एक महत्त्वाचा मेसेज दिला आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालय यामुळे फडणवीस सर्वाधिक पावरफुल मंत्री म्हणून परत एकदा ओळखले जातील.
- एकनाथ शिंदे, अजित पवारांना तगडी खाती: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वजनदार म्हणून ओळखले जाणारे नगर विकास, गृहनिर्माण आणि एमएस आरडी सी खाते आहे. शहरी भागाशी निगडित असणारे या महत्त्वाच्या खात्यांचे मोठमोठे बिल्डर थेट संपर्क हेच वजन वाढवण्याचे प्रमुख कारण आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जितके हे वजनदार खाते आहेत तितकेच एकनाथ शिंदे यांना ताकद दिल्याचे दिसून येत असून एकनाथ शिंदे यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न आवर्जून केल्याचे दिसून येते. अजित पवार परत एकदा अर्थमंत्री म्हणून काम पाहतील त्याचवेळी त्यांनी यंदा स्वतःकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील घेतले आहे.
- साताऱ्याचा डंका: सातारा जिल्हा सर्वाधिक कॅबिनेट मंत्र्याचा संख्या असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपद असणाऱ्यांना देखील तितकेच वजनदार खाती देण्यात आले आहेत. शिवेंद्रसिंह भोसले सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरे ग्रामविकास, मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन तर शिवसेनेचे नेते शंभूराजे देसाई यांना पर्यटन खनिज कर्म माजी सैनिक कल्याण अशी खाती देण्यात आली आहेत. ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम पर्यटन ही महत्त्वाची खाती सातारा जिल्ह्यात मंत्रांना असल्याने अधिक वजनदार असा हा जिल्हा राहील
- पहिल्यांदा मंत्री, मोठी खाती: पहिल्यांदाच कॅबिनेट आणि खाती सुद्धा जोरदार असेही काही मंत्री या मंत्रिमंडळात दिसून येतात. त्यात पहिल्या क्रमांकावर जयकुमार गोरे आहेत. जयकुमार गोरे यांना ग्राम विकास सारखे महत्त्वाचे खाता दिले आहे तर दुसरीकडे शिवेंद्रराजे भोसले यांना देखील सार्वजनिक बांधकामसारखे मोठे खाते मिळाले आहे. आकाश फुंडकर यांना देखील कामगार मंत्रालय महत्त्वाचे दिले गेले आहे. माणिकराव कोकाटे कृषिमंत्री तर प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री असे महत्त्वाचे खाते दिल्याचे दिसून येत आहे.
- उदय सामंत: मागील सरकारमध्ये उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली. आता परत एकदा उद्योग मंत्रालय उदय सामंत यांच्याकडेच दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगाला चालना मिळवायची आहे अशा परिस्थितीत या महत्त्वाच्या खात्यात उदय सामंत यांना प्राधान्य दिले आहेत.
- आशिष शेलारांची बोळवण: आशिष शेलार आणि लोढा यांच्या पदरात फार काही नाही. मुंबईत मुळातच दोनच अवघे कॅबिनेट मंत्री देण्यात आलेत. त्यात मंगल प्रभात लोढा यांना मागील सरकारमधील असलेले कौशल्य विकास खातं कायम ठेवले आशिष शेलार यांना चांगली खते मिळतील अशी अपेक्षा होती, पण शेलार यांना देखील माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक खात्यावरच समाधान मानावे लागणार आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून या दोन्ही मंत्र्यांना चांगली खाते मिळतील अशी अपेक्षा होती पण तूर्तास तरी इतर दर्जेदार खात्यापेक्षा कमी खात्यांवर समाधान मानायची वेळ आली आहे.
- पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंना झटका: मुंडे बहिण भावांना मागील वेळेसच्या तुलनेने यंदा परत एकदा कमीच दर्जाची खाती मिळाली आहेत. पंकजा मुंडे यापूर्वीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असताना महिला व बालविकास ग्रामविकास अशी महत्त्वाची खाती होती. यंदा मात्र पंकजा मुंडे यांना पर्यावरण पशुसंवर्धन अशी खाती देण्यात आली आहेत. तर दुसरीकडे गेले अनेक दिवस वादग्रस्त असलेले धनंजय मुंडे यांना मागील वेळेसच्या तुलनेने कमी दर्जाच्या मानला गेलेला अन्न व नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षण खातं घेण्याची वेळ आली आहे. दोन वजनदार नेत्यांना कमी दर्जाचीच खात्यांमध्ये समाधान मानावे लागत आहे.
- लाडकी बहीण दादांकडे: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करणारे महिला व बालविकास खातं अजित पवारांनी परत एकदा आदिती तटकरे यांना दिले आहे. तर या खात्याचे राज्यमंत्री म्हणून भाजपाने मेघना बोर्डीकर यांना संधी दिली आहे. आगामी काळात लाडकी बहीण योजनेचा परत एकदा प्रचार प्रसारणामध्ये भाजप राष्ट्रवादी यांना वर्चस्व ठेवायचे आहे, यामुळे ही महत्त्वाची खाती मानली जात आहेत.
- नाराजी दूर: माधुरी मिसाळ यांची कॅबिनेट पदावर वर्णी लागली नाही, यामुळे नाराजी होती. मात्र राज्यमंत्रीपदांमध्ये मिसाळ यांना नगरविकास परिवहन वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय अशी महत्त्वाची खाती देत नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पंकज भोयर यांना गृह ग्रामीण राज्यमंत्री तसेच गृहनिर्माण महत्त्वाचे खाते दिली आहेत. योगेश कदम यांना शहर गृहराज्यमंत्री महसूल ग्रामविकास राज्यमंत्री अशी महत्त्वाची खाते दिली आहेत.
- शिंदेंच्या ठाण्याचाही वरचष्मा: ठाणे जिल्हा देखील अधिक वजनदार मंत्र्यांचा गणला गेला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी नगर विकास गृहनिर्माण यासह एम एस आर डी सी खाते स्वतःकटे ठेवले आहे. त्याच वेळी प्रताप सरनाईक यांना देखील परिवहन सारखे महत्त्वाचं खाते दिले गेले आहे.