शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ‘ॲग्रीस्टॅक' (Agri Stack) योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डाटाबेस तयार करून, शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील.
ॲग्रीस्टॅक म्हणजे काय?
‘ॲग्रीस्टॅक' म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली. यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक (Unique Farmer ID) दिला जातो. या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. तसेच, पीककर्ज, विमा, अनुदान, खत व बियाणे या सर्व बाबतीत ही योजना उपयुक्त ठरेल.
योजनेचे स्वरूप आणि फायदे
थेट लाभ हस्तांतरण (DBT)
पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत इत्यादी अनुदाने थेट बँक खात्यात जमा होतील. यामुळे मध्यस्थांची गरज भासणार नाही, पारदर्शकता राहील.
पीककर्ज व विम्यासाठी सोपी प्रक्रिया
पीक विमा आणि कर्ज मिळवण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. हे एक ओळखपत्र परिपूर्ण ठरेल. ॲग्रीस्टॅकमधील नोंदीनुसार कर्ज मंजुरी जलद गतीने होईल.
शेतीसाठी अनुदान आणि इतर सुविधा
खत, बियाणे व औषधांसाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळेल.हवामान अंदाज, मृदा परीक्षण, सिंचन योजना यांची माहिती सहज उपलब्ध होईल.
नैसर्गिक आपत्ती व शेतीसाठी मदत
दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी किंवा अन्य आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीसाठी शेतकऱ्यांची माहिती आधीच उपलब्ध असेल, त्यामुळे मदतीचे वाटप जलदगतीने होईल.
या योजनेच्या नोंदणीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिबिरांचे आयोजन केले गेले आहे. महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे ही नोंदणी केली जाईल.
कागदपत्रे
- आधार कार्ड
- आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक
- सातबारा उतारा (७/१२)
- नोंदणी प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता नोंदणी करून घ्यावी.