Political News: राज-उद्धव यांच्यात 20 मिनिटे काय चर्चा झाली? 'सामना'तून सविस्तर माहिती आली समोर

Raj - Uddhav Thackeray Meet: राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येतील, अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. मात्र काल सकाळी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री या निवासस्थानी खास भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे- राज ठाकरे यांच्यामध्ये 20- 25 मिनिटे चर्चाही झाली. या भेटीने दोन्ही ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याने, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. ही नवी आशा युतीची मुळे धरणार की पुन्हा एकदा कोमेजून जाणार, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मध्ये ठाकरे बंधूंच्या मातोश्रीवरील या २० मिनिटांच्या भेटीत नेमके काय घडले, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

भेटीदरम्यान, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना गुलाबांचा बुके देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दोघांनीही एकमेकांना गळाभेट घेतली. त्यानंतर दोघेही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले आणि त्यांच्या आसनासमोर नतमस्तक झाले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तसेच शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांवरही त्यांच्यात चर्चा झाली. जवळपास 20 मिनिटे राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी होते. या कालावधीत दोन्ही बंधूंमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. भेटीनंतर निघतानाही उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरेंना सोडायला बाहेर आले. सगळ्यांना हात उंचावून नमस्कार करत राज ठाकरे माघारी परतले.

(नक्की वाचा- Raj Thackeray: 'मातोश्री'वर बंधुभेट! राज ठाकरे- उद्धव ठाकरेंच्या भेटीला, गळाभेट घेत दिल्या खास शुभेच्छा)

राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येतील, अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. मात्र काल सकाळी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरून संजय राऊत यांना फोन करून, "मी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येत आहे," असे सांगितले.

(नक्की वाचा - Ratnagiri News: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील)

संजय राऊत यांनी ही माहिती तात्काळ उद्धव ठाकरेंना दिली. त्यानंतर राज ठाकरे दादर परिसरातील आपल्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानावरून निघाले आणि काही मिनिटांतच मातोश्रीवर पोहोचले. ही भेट केवळ कौटुंबिक होती की यामागे काही राजकीय समीकरणे याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे बंधुंची ही वाढदिवसानिमित्त भेट असली तरी महापालिका निवडणुका जवळ येत असतनाच ठाकरे बंधुंमध्ये ही जवळीक वाढल्याचे दिसत आहे. याच महिन्यात ठाकरे बंधुंची ही दुसरी भेट आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या युतीची सूत्रे पाहायला मिळणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Advertisement

Topics mentioned in this article