जाहिरात

Ratnagiri News: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील

Ratnagiri News : ठाकरे गटाच्या महिला तालुकाप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्यासह तीन माजी सभापतींचा समावेश आहे. या नेत्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला गुहागरमध्ये मोठा हादरा बसला आहे.

Ratnagiri News: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील

राकेश गुडेकर, रत्नागिरी

Ratnagiri News : गुहागरच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेना ठाकरे गटाला मोठा आणि स्थानिक आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या अनेक प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे गुहागरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

गुहागरमधील हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात ठाकरे गटाच्या महिला तालुकाप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्यासह तीन माजी सभापतींचा समावेश आहे. या नेत्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला गुहागरमध्ये मोठा हादरा बसला आहे.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या प्रवेशामुळे महायुतीची ताकद वाढल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, "नेत्रा ताई, नाटेकर हे थोडे अगोदर आले असते, तर कोकणातले चित्र वेगळे दिसले असते." सध्या कोकणामध्ये 15 पैकी 14 आमदार महायुतीचे आहेत, असे नमूद करत शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला की, "आता तुम्ही आल्याने पुढच्या वेळेस 15 पैकी 15 आमदार महायुतीचे होतील.

नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्रा ठाकूर यांनी यावेळी बोलताना आपल्या पक्षप्रवेशामागील कारण स्पष्ट केले. "लोकांचा कल हा सत्ताधारी पक्षाकडे होता, त्यामुळे सर्वांच्या आग्रहास्तव आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे, नेत्रा ठाकूर यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सत्ताधारी पक्षासोबत राहिल्यास विकासकामे अधिक चांगल्या प्रकारे करता येतात, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या पक्षप्रवेशामुळे गुहागर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे परिणाम दिसून येतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भास्कर जाधव यांच्यासाठी हा निश्चितच मोठा धक्का मानला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com