
कोकणासाठी चिपी विमानतळ हे अतिशय महत्वाचे होते.पण काही वेळ चालल्यानंतर इथली विमान सेवा बंद झाली होती. त्यामुळे कोकणवासीयांनी नाराजीचा सुर आळवला होता. मुंबई -चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवाने आणि त्यासंदर्भातील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्यशासन सकारात्मक असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यासाठी सरकारने उडानच्या धर्तीवर आरसीएस फंडिंगचा निर्णय घेतला आहे असं ही राणे यांनी सांगितले. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. मंत्रालयात चिपी - मुंबई विमानसेवा विषयी बैठक झाली. त्यावेळी राणे बोलत होते. बैठकीस सचिव संजय सेठी, विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत चिपी विमानतळाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय झाला.
चिपी -मुंबई विमानसेवा सुरू होणे ही सिंधुदुर्गसाठी भावनिक बाब असल्याचे राणे यांनी सांगितले. या विमानतळासाठीच्या पायाभूत सुविधाही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने चिपी विमानतळास वेगळे महत्व आहे. चिपी -मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणारे सर्व परवाने एक महिन्यात घेण्यात यावेत. विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर यांनी समन्वयाने काम करावे असं ही ते म्हणाले.
भविष्यात या विमानतळाला मोठे महत्त्व येणार असल्याने प्राधान्याने कामे करावीत. सुशोभीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, असे निर्देशही राणे यांनी दिले. शिवाय नवी मुंबई येथील बेलापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मरिनाचे काम येत्या मार्च 2026 पर्यंत पूर्ण करावे. यासाठी ठेकेदार कंपनीने नियोजन करावे. तसेच या ठिकाणी दुकानासाठी गाळे उभारून ते भाडेतत्वावर देण्यात यावेत. या कामाचे सर्व परवाने प्राप्त असल्याने हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित करावा असे निर्देश ही राणे यांनी दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world