Who is the Editor of Saamana: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असलेले आणि राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेत असणारे वृत्तपत्र म्हणजे 'सामना'. या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून खासदार संजय राऊत काम पाहत आहेत, हे सर्वश्रुत आहे. मात्र, 'सामना'चे संपादक नेमके कोण आहेत? या प्रश्नाभोवती सध्या एका जाहिरातीमुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे. 'सामना' वृत्तपत्राच्या सर्वात शेवटच्या पानावर तळाशी संपादक, कार्यकारी संपादक, पत्ता आणि इतर सर्व आवश्यक माहिती नियमितपणे प्रकाशित केली जाते. या माहितीनुसार, 'सामना' वृत्तपत्राचे संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव स्पष्टपणे लिहिलेले आहे.
जाहिरातीमुळे वाढला संभ्रम
'सामना'चे खरे संपादक उद्धव ठाकरे असताना, एका जाहिरातीने मात्र या भूमिकेवर संभ्रम निर्माण केला आहे. पीएनजी ज्वेलर्स या प्रसिद्ध दालनाच्या एका जाहिरातीत रश्मी ठाकरे यांचा उल्लेख सामना आणि मार्मिकच्या मुख्य संपादिका' असा करण्यात आला आहे. ही जाहिरात काही मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये पूर्ण पानावर छापण्यात आली आहे.
Saamana News
ही जाहिरात 'सामना' वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर देखील छापण्यात आली आहे. मात्र 'सामना'च्या पहिल्या पानावर छापलेल्या जाहिरातीमध्ये फक्त रश्मी ठाकरे यांचे नाव छापण्यात आले आहे आणि तिथे त्यांना 'सामनाच्या संपादिका' असा कुठेही उल्लेख केलेला नाही. मात्र, इतर वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या जाहिरातीत उल्लेख असल्याने हा संभ्रम अधिक वाढला आहे.
या जाहिरातीत रश्मी ठाकरे यांचा 'सामना आणि मार्मिकच्या मुख्य संपादिका' असा चुकीचा उल्लेख करण्यात आल्यामुळे राजकीय आणि माध्यम वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 'सामना'च्या अधिकृत माहितीनुसार उद्धव ठाकरे हेच संपादक आहेत.
काय आहे जाहिरात?
पीएनजी ज्वेलर्सची नवी शाखा दादरमध्ये सुरू होत आहे. या दालनाच्या उद्घाटन सोहळ्याची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली आहे. या ज्वेलर्सच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा आज रश्मी ठाकरे आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.