मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात संध्याकाळी वातावरण अचानक बदललं. सर्वत्र वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुंबईकरांची या पावसामुळे चांगलीच धावपळ झाली. मात्र अचानक हे वातावरण का बदललं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत सांगितलं की, मागील अनेक दिवसांपासून मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे जमीन मोठ्या प्रमाणात तापत आहे. त्यामुळे तापलेली जमीन, हवेतील आर्द्रता आणि वारे या सर्व गोष्टी जुळून आल्याने राज्यातील अनेक भागात आणि मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पाऊस आणि वादळ निर्माण झालं.
नक्की वाचा- अंधार दाटला, धुळीचे वादळ आले, अवघ्या काही मिनिटात वातावरण बदललं
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत पाऊस
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र सध्याकाळी अचानक या सर्व भागात सोसाट्याचा वारा सुटला. सर्वत्र धुळीचं वादळ सुरु झालं. काही क्षणात जोरदार पावसाने देखील हजेरी लावली. हवामान विभागाने आधीच मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचा अंदाज वर्तवला होता.
(नक्की वाचा: राज्यात अनेक जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांचं, फळबागांचं नुकसान)
अवकाळी पावसाचा वाहतुकीवरही परिणाम
मुंबईत अचानक झालेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मुंबईत अनेक भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. परिणाम झाला आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची वाहतूक देखील विस्कळीत झाली. कमी दृश्यमानतेमुळे मुंबई एअरपोर्टवर विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. मुंबई विमातळावरील वाहतूक पुढील माहिती मिळेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाने दिली आहे.