मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आलेले आहेत. महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. सर्व कामे डिसेंबर 2024 अखेर पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत सांगितले.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत विधानपरिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिले. रविंद्र चव्हाण म्हणाले की, मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गादरम्यान पनवेल ते इंदापूर ही लांबी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारित आहे.
(नक्की वाचा- मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची मोठी घोषणा)
पनवेल ते कासू या लांबीमधील काम जवळपास पूर्ण झाले असून फक्त सेवा रस्ते व गडब येथील भुयारी मार्गाचे काम राहिले आहे. कासू ते इंदापूर या लांबीमधील 72 टक्के काम पूर्ण झाले असून भुयारी मार्ग, उड्डाणपुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
(नक्की वाचा- उल्हासनगर महापालिकेत 'डमी' कर्मचारी; सरकारी कर्मचारी वैयक्तिक कामात व्यस्त)
इंदापूर ते झाराप ही लांबी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अखत्यारित आहे. या लांबीमधील 85 टक्के काम पूर्ण झालेले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. इंदापूर ते झाराप या लांबीमध्ये एकूण 10 पॅकेजेसच्या कामांसाठी मंजूर असलेल्या एकूण 6100.44 कोटी एवढ्या रक्कमेपैकी आजपर्यंत 3580.33 कोटी रुपये एवढा खर्च झालेला आहे. एकूण 355.28 किमी संकल्पित लांबी पैकी 295.402 किमी लांबीचे काम पूर्ण झालेले आहे. महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असेही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.