मनोज सातवी, पालघर
Palghar News : प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडचे लाड पुरवण्यासाठी कहरच केला. गर्लफ्रेडला भेटायला येण्यासाठी एका मजनूने तब्बल 7 रिक्षा, 1 स्कूटर आणि 1 मोबाईल चोरल्याची घटना नालासोपारा येथील आचोळे पोलिसांनी उघडकीस आणली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आचोळे पोलिसांनी या प्रकरणी शशिकांत मलेश कामनोर (वय 24) याला अटक केली आहे. आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मुंबई उपनगरातून येताना विविध भागांतून वाहनांची चोरी करत होता.
(नक्की वाचा- Nagpur News : प्रेयसीच्या जळत्या सरणावर तरुणाची उडी; उपस्थितांनी धू धू धुतला)
गर्लफ्रेंडवर छाप पाडण्यासाठी आणि तिचे खर्च भागवण्यासाठी शशिकांतने अनोखा मार्ग अवलंबला. तो मुंबईतील रिक्षा चोरून त्या रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करायचा. रिक्षा चालवून मिळणाऱ्या पैशातून तो गर्लफ्रेंडचे हट्ट पुरवायचा. मात्र, रिक्षाचे पेट्रोल किंवा सीएनजी संपल्यावर तो त्या रिक्षा तिथेच सोडून फरार होत असे. अशाच प्रकारे त्याने सात वेळा रिक्षा चोरी करून त्यांचा वापर केला होता.
(नक्की वाचा - WFH Fraud : इन्स्टाग्रामवरील जाहिरातीला भुलली, 'वर्क फ्रॉम होम'च्या बहाण्याने महिलेला 10 लाखांचा गंडा)
पोलिसांनी विविध तक्रारींचा छडा लावत शशिकांतला ताब्यात घेतले असता, त्याने सात रिक्षा, एक स्कूटर आणि एक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याने चोरी केलेल्या रिक्षा मुख्यतः आचोळे, विरार, देवनार, अंधेरी, बांद्रा आणि एमएचबी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी केल्या होत्या. यातील आचोळे पोलीस ठाणे 2, विरार 1, देवनार 1, अंधेरी 1, बांद्रा 2 आणि एमएचबी 1 अशा एकूण 8 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.