रिल बनण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. त्याचाच एक प्रत्यय मध्य रेल्वेवर आला. दोन तरूण रिल बनवण्यासाठी चक्क लोकल ट्रेनच्या मोटरमनसाठी असलेल्या केबिनमध्ये घुसले. त्यानंतर त्यांनी रिलही बनवली. हे रिल बनवणे त्यांच्या चांगलेच अंगलट आले. मोटरमनच्या केबिनमध्ये जबरदस्ती घुसणे हा गुन्हा असतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत या दोघांनाही अटक केली. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाण्याऱ्या लोकल ट्रेनमध्ये हा संपुर्ण प्रकार घडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसारा स्थानकावर थांबलेल्या लोकल ट्रेनच्या मोटरमनच्या केबिनमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन तरूणांना मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने पकडले आहे. राजा हिम्मत येरवाल आणि रितेश हिरालाल जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कसारा स्थानकात प्लॅटफॉर्म 4 वर उभ्या असलेल्या लोकल ट्रेनमध्ये मोटरमनच्या केबिनमध्ये एका आरोपीने प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोडही करण्यात आला.
ट्रेंडिंग बातमी - सुपारी आंदोलन! 'होय ते आमचेच शिवसैनिक पण...' संजय राऊतांनी हात का झटकले?
मध्य रेल्वेच्या RPF पथकाने सायबर सेलच्या सहकार्याने या दोघांचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी नाशिक इथून पकडले. चौकशीदरम्यान, आरोपीने सोशल मीडियासाठी व्हिडीओ तयार करण्यासाठी ट्रेनच्या मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अलीकडेच अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. ज्यात उत्तर रेल्वेच्या गुलजार शेखच्या प्रकरणाचा समावेश आहे, ज्यांना रेल्वे सुरक्षा दलाने व्हिडीओ बनवण्यासाठी रेल्वे रुळांशी छेडछाड केल्याप्रकरणी अटक केली होती.
ट्रेंडिंग बातमी - अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक
यापुढे सर्व नागरिक आणि प्रवाशांना रेल्वे विनंती करीत आहे की, रेल्वेच्या आवारात कोणीही असे कृत्य करत असल्यास 9004410735 किंवा 139 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी. प्रवाशांच्या सुरक्षिततेला भारतीय रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य राहिल असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवासी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत.