राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी झीशान सिद्दिकी यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची झीशान सिद्दिकी यांना संधी देण्याची इच्छा मात्र पक्षातून सिद्दिकी यांच्या नावाला प्रचंड विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लक्षात घेऊन उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. तर काहींची विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी नको अशी भूमिका आहे. झिशान सिद्धकी यांच्याकडून मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेतील महायुतीचे संख्याबळ पाहात या पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. पाच पैकी तीन जागा भाजप तर प्रत्येकी एक जागा शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी झिशान सिद्दिकी, आनंद परांजपे आणि संग्राम कोते पाटील यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.
(नक्की वाचा - Maharashtra BJP : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाची यादी ठरली! अनुभवी नेत्याला पहिल्यांदाच संधी?)
भाजपकडून कुणाला संधी मिळणार?
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची यादी भाजपानं दिल्लीला पाठवली आहे. यामध्ये दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. माधव भंडारी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी दीर्घकाळ पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम केले आहे. ते अनेक वर्षांपासून विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी इच्छूक होते. पण, त्यांना आजवर नेहमीच आमदारकीनं हुलकावणी दिली आहे. आता यंदा त्यांच्या नावाचा पक्षानं समावेश केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोणत्या जागा रिक्त?
विधान परिषदेवर असलेल्या प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडाळकर हे भाजपचे सदस्य विधानसभेत निवडून गेले आहेत. तर राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि आमश्या पाडवी (शिवसेना शिंदे गट ) हे दोघेही विधानसभेवर निवडून आले आहेत. हे पाचही जण विधानसभेवर निवडून गेल्या मुळे त्यांची विधानपरिषदेतील आमदारकी आपोआप संपुष्टात आली आहे. पाच पैकी तीन जागा या भाजपच्या आहेत. तर एक एक जागा या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची आहे.