
Virat Kohli Retirement: क्रिडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज, रनमशीन विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. दोन दिवसांपूर्वीच विराट कोहलीने टेस्टमधून निवृत्तीचे संकेत दिले होते. तसा निर्णयही त्याने बीसीसीआयला कळवला होता. त्यानंतर आत इंस्टाग्रामवर पोस्ट करत विराटने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे.
काय आहे विराट कोहलीची पोस्ट?
कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवात करुन 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मी जे धडे सहन करेन ते शिकवले. पांढऱ्या जर्सीमध्ये खेळण्यात काहीतरी खोलवरचे वैयक्तिक गुण असतात. शांत खेळ, लांब दिवस, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. या फॉरमॅटमधून बाहेर पडणे सोपे नाही पण ते योग्य वाटते.
मी माझ्याकडे जे काही होते ते सर्व दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे. मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने ज्या सामन्यांमध्ये, ज्या लोकांसोबत मैदानात खेळलो त्यांच्यासाठी आणि या प्रवासात मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचा निरोप घेत आहे. पाठीमागे वळून बघताना मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहीन, असे विराट कोहलीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
विराट कोहलीची कसोटी कारकिर्द
दरम्यान, विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधला टीम इंडियाचा सर्वात यशस्वी आणि धडाकेबाज फलंदाज होता. विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने देशासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत. विराटने 210 डावांमध्ये 46. 85च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 7 द्विशतके, 30 शतके आणि 31 अर्धशतके आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world