रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजमध्ये टी-२० वर्ल्डकप खेळत आहे. भारतीय संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ या स्पर्धेनंतर संपतो आहे. राहुल द्रविडने आपण पुन्हा या पदासाठी अर्ज करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. ज्यानंतर BCCI ने या पदासाठी नवीन उमेदवाराचा शोध सुरु केला आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, या पदासाठी टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने या पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. गौतम गंभीरशिवाय कोणत्याही खेळाडूने या पदासाठी अर्ज दाखल केलेला नाही. काही दिवसांपूर्वीच BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) ने गौतम गंभीरची मुलाखतही घेतली. या मुलाखतीत गंभीरने BCCI समोर आपल्या 5 मागण्या ठेवल्याचं कळतंय.
हे ही वाचा - अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर विजय, अ गटात Super 8 फेरीची शर्यत झाली रंगतदार
नवभारत टाइम्स वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, CAC सोबत आपल्या बैठकीमध्ये गौतम गंभीरने आपल्या पाच मागण्या समोर ठेवल्याचं कळतंय.
गौतम गंभीरची पहिली मागणी -
भारतीय संघाचं सर्व मॅनेजमेंट हे हेड कोच या नात्याने माझ्याकडे असेल. बोर्ड यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही.
गौतम गंभीरची दुसरी मागणी -
बॉलिंग, बॅटींग, फिल्डींग कोच गौतम गंभीर आपल्या पसंतीचा निवडेल.
गौतम गंभीरची तिसरी मागणी -
विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी यासारख्या सिनीअर प्लेअर्ससाठी 2025 ची चॅम्पिअन्स ट्रॉफी ही शेवटची संधी असेल. जर हे खेळाडू भारताला ही स्पर्धा जिंकवून देऊ शकले नाहीत तर त्यांना संघात जागा मिळणार नाही. परंतु या खेळाडूंना तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी मिळणार की नाही याबाबत मात्र स्पष्ट समजू शकलं नाहीये.
गौतम गंभीरची चौथी मागणी -
कसोटी क्रिकेटसाठी भारताचा संपूर्णपणे वेगळा संघ असेल.
गौतम गंभीरची पाचवी मागणी -
पदभार स्विकारताच 2027 चा वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेऊन गौतम गंभीर कामाला सुरुवात करेल.
गौतम गंभीरने केलेल्या मागणीनुसार, जर 2025 च्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारताचे सिनीअर खेळाडू अपयशी ठरले आणि त्यांना संघातलं स्थान गमवावं लागलं तर हे खेळाडू फक्त कसोटी क्रिकेट खेळतील का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. याचसोबत आगामी वर्षात वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची अंतिम फेरी असणार आहे. या स्पर्धेतही भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गौतम गंभीरकडे भारतीय संघाची सूत्र गेली तर संघात नक्की काय-काय बदल होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.