T-20 World Cup मधली Super 8 फेरी आता खऱ्या अर्थाने रंगतदार झाली आहे. ब गटात सहा सामने जिंकूनही दक्षिण आफ्रिका नेट रनरेटमुळे स्पर्धेबाहेर जाण्याच्या काठावर आहे. दुसरीकडे अ गटात टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून सेमी फायनलच्या स्पॉटवर दावेदारी सांगितली. परंतु रविवारी सकाळी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला आणि अ गटातली सेमी फायनलची समीकरणं इंटरेस्टींग झाली आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्या संघाला हरवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना ६ विकेटच्या मोबदल्यात १४८ धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीला हे आव्हान ऑस्ट्रेलिया सहज पूर्ण करेल असं वाटत असतानाच अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत कांगारुंच्या डावाला खिंडार पाडलं. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. परंतु सरतेशेवटी त्याची झुंजही कमीच पडली.
हे ही वाचा - T-20 WC : बांगलादेशी वाघ टीम इंडियासमोर हतबल, भारताने ५० धावांनी जिंकला सामना
अफगाणिस्तानकडून नवीन उल-हकने प्रभावी मारा करत ३ विकेट घेतल्या. अफगाणिस्तानच्या या सनसनाटी विजयामुळे अ गटात सेमी फायनलला पोहचण्याची शर्यत मात्र आता रंगतदार झाली आहे. पाहूयात तिन्ही संघाला सेमी फायनलला पोहचण्यासाठी काय निकष आहेत ते.
१) ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलला जायचं असेल तर काय करावं लागेल?
सध्या ऑस्ट्रेलियाचा रनरेट आहे (+ 0. 223) आताही ते अफगाणिस्तानला सहज मागे टाकू शकतात...अफगाणिस्तानचा रन रेट आहे (- ०.६५०)...यासाठी ऑस्ट्रेलियाला आपल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १५१ रन्सचं टार्गेट दिलं तर ऑस्ट्रेलियाला ते १४ ओव्हर्समध्ये पूर्ण करावं लागेल. अशाच पद्धतीने ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा बॅटींग करुन जर १९० किंवा त्यापेक्षा मोठी धावसंख्या उभी केली...तर त्यांना टीम इंडियाला १५० धावांच्या आत रोखावं लागेल. १५० धावांचा टप्पा ओलांडला भारताने तरीही ते सेमी फायनलला जाऊ शकतात.
२) भारताला काय करावं लागेल?
टीम इंडियाने आपला अखेरचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकला तर ते थेट सेमी फायनलमध्ये पोहचतील. किंवा या सामन्यात पराभव जरी पदरात पडला तरी भारताला काळजी घ्यावी लागेल की हा पराभव फार मोठ्या फरकाने नसेल. + 2.425 चा रनरेट हा टीम इंडियासाठी सध्या सर्वात जमेची बाजू आहे. परंतु ऑस्ट्रेलियाने जर या सामन्यात मोठा विजय मिळवला जसं आपण वर डिस्कस केलं तसं तर टीम इंडियाचं स्थान धोक्यात येऊ शकतं
३) अफगाणिस्तानला काय करावं लागेल?
अफगाणिस्तानचं भवितव्य हे भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर अवलंबून असेल, समजा भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं तर अफगाणिस्तानला आपल्या अखेरच्या सामन्यात बांगलादेशला हरवावं लागेल आणि त्यात विजय मिळवून ते सेमी पायनलमध्ये जाऊ शकतात. परंतु ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर मात्र अफगाणिस्तानचा पुन्हा एकदा स्वप्नभंग होऊ शकतं
हे ही वाचा - T-20 WC : अफगाणिस्तानने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव, विश्वचषकात मोठा उलटफेर होणार?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world