गुजरात टायटन्सची पंजाब किंग्जवर 3 विकेटने मात

राहुल तेवतियाने (Rahul Tewatiya) एक बाजू लावून धरत गुजरातला अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला.

जाहिरात
Read Time: 2 mins
फोटो सौजन्य - IPL
मुंबई:

आयपीएलच्या सतराव्या हंगामात रविवारी पंजाब किंग्ज संघाला आणखी एकदा पराभवाचं तोंड पहावं लागलं. मुल्लनपूर येथे झालेल्या सामन्यात पंजाबने अखेरपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु सरतेशेवटी त्यांचे प्रयत्न 3 विकेटने कमीच पडले. गुजरातच्या गोलंदाजांनी आज शिस्तबद्ध मारा करत पंजाबला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही.

पंजाब किंग्जची आक्रमक सुरुवात -

पहिल्यांदा फलंदाजी करत असताना पंजाब किंग्जने आक्रमक सुरुवात केली. शिखर धवनच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणारा सॅम करन प्रबसिमरन सिंगच्या साथीने सलामीला आला. दोघांनीही गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली.

अखेरीस मोहीत शर्माने प्रबसिमरनला बाद करत पंजाबची ही जोडी फोडली. त्याने 21 बॉलमध्ये 3 फोर-सिक्स लगावत 35 धावा केल्या.

पंजाबची घसरगुंडी, पण अखेरच्या फळीने सावरलं -

यानंतर मात्र पंजाबच्या डावाला गळती लागली. रायली रुसो, सॅम करन जितेश शर्मा असे करत सर्व महत्वाचे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. 16 व्या ओव्हरमध्ये 7 बाद 99 अशी बिकट अवस्था असताना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात आलेल्या हरप्रीत सिंग आणि हरप्रीत ब्रार यांनी पंजाबच्या डावाला आकार दिला. या दोघांनीही केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबने निर्धारित षटकांत 142 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून साई किशोरने 4, मोहीत शर्मा-नूर अहमदने प्रत्येकी 2-2 तर राशिद खानने 1 विकेट घेतली.

गुजरातची अडखळती सुरुवात, परंतु सामन्यावर पकड कायम -

तुलनेने सोपं आव्हान मिळालेल्या गुजरातने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. अर्शदीप सिंगने वृद्धीमान साहाला बाद करत गुजरातला पहिला धक्का दिला. यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि इम्पॅक्ट प्लेअर साई सुदर्शन यांनी छोटेखानी इनिंग खेळली. या दोघांनाही बाद करण्यात पंजाबच्या गोलंदाजांना यश आलं खरं, परंतु तोपर्यंत गुजरातचं पारडं सामन्यात जड झालेलं होतं.

Advertisement

मोक्याच्या क्षणी गुजरातच्या डावाला गळती -

सामना गुजरातचा संघ सहज जिंकेल असं वाटत असतानाच ठराविक अंतराने एका बाजूने विकेट पडत राहिल्या. डेव्हिड मिलर, ओमराझी, शाहरुख खान, राशिद खान हे फलंदाज माघारी परतले. अखेरीस राहुल तेवतियाने एक बाजू लावून धरत गुजरातला अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला. त्याने 18 बॉलमध्ये 7 फोरसह नाबाद 36 धावा केल्या. पंजाबकडून हर्षल पटेलने 3, लिव्हींगस्टोनने 2 तर अर्शदीप आणि सॅम करनने 1-1 विकेट घेतली.

हे ही वाचा - RCB ची अखेरच्या ओव्हरपर्यंत झुंज, KKR ची एका धावेने बाजी

Topics mentioned in this article