Ayush Mhatre House Video : भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर-19 वर्ल्डकपचा फायनलचा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने 411 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 412 धावांचं तगडं आव्हान होतं. परंतु, भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या सर्व फलंदाजांना 311 धावांवर बाद केलं आणि भारताने या सामन्यात 100 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी केली. तर कर्णधार आयुष म्हात्रेनं 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताने वर्ल्डकपचा सामना जिंकताच संपूर्ण देशभरात विजयी जल्लोष करण्यात आला. पालघरच्या आयुष म्हात्रेच्या घरीही तिरंगा फडकवून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आयुषच्या घरातील जल्लोषाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आतापर्यंत सहा वेळा वर्ल्डकपचा किताब जिंकला
जिम्बाब्वे आणि नामेबिया यांनी संयुक्तपणे यजमानपद भूषवलेल्या या स्पर्धेत भारताच्या युवा संघाने अप्रतिम कामगिरी करत जेतेपद पटकावलं. मोहम्मद कैफपासून ते पृथ्वी शॉ आणि आता आयुष म्हात्रेपर्यंत,भारताची विजेतेपद मिळवणाऱ्या कर्णधारांची परंपरा अधिक भक्कम झाली आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत सहा वेळा वर्ल्डकपचा किताब जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने चार वेळा,पाकिस्तानने दोन वेळा तर वेस्टइंडीज,दक्षिण आफ्रिका,बांगलादेश आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे.मागील 2024 चा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
— Naresh Shende (@NareshShen87640) February 6, 2026
कर्णधार आयुष म्हात्रेची शानदार अर्धशतकी खेळी
कर्णधार आयुष म्हात्रेने जबरदस्त फलंदाजी करून 51 चेंडूंत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली.अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या खास कर्णधारांच्या यादीत आता आयुष म्हात्रेच्या नावाचाही समावेश झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world