India vs Pakistan Greatest Rivalry : सचिन, सेहवाग नाही तर 'या' फलंदाजाला टरकून होता शोएब अख्तर

जाहिरात
Read Time: 5 mins
मुंबई:

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar Pakistan Pace Bowler) हा जगातील वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. भल्याभल्या फलंदाजांना आपल्या वेगवान गोलंदाजीने थरथरायला लावणारा शोएब अख्तर फक्त एका फलंदाजाला घाबरत होता. हा फलंदाज भारताचा होता आणि त्याने आपल्या गोलंदाजीने अनेकांना धक्के दिले होते. 11 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणारा या फलंदाज माझ्यासाठी एका वाईट स्वप्नासारखा होता अशी कबुली खुद्द शोएब अख्तरने दिली आहे. Netflix वर The Greatest Rivalry India vs Pakistan नावाची डॉक्युसिरीज प्रसिद्ध झाली आहे. तीन भागांच्या या मालिकेमध्ये शोएब अख्तरने त्याला सतावणाऱ्या फलंदाजाबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात होत असला तरी त्याबद्दलची प्रचंड उत्सुकता या दोन देशांमध्ये बघायला मिळते. नेटफ्लिक्सवरील या मालिकेमध्ये दोन देशांमध्ये सामना सुरू असताना नेमकं काय होत असतं याचं नेमकं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2004 साली भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. 5 एकदिवसीय सामने आणि 3 कसोटी सामने असा भरगच्च दौरा त्यावेळी आयोजित करण्यात आला होता. पाकिस्तानात खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली होती. या मालिकेतील प्रत्येक सामना हा अत्यंत रंगतदार असा ठरला होता. भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली होती तर कसोटी सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. 

Advertisement

नक्की वाचा : Champions Trophy 2025: एक तासापेक्षा कमी वेळ आणि Ind vs Pak सामन्याची तिकीटं संपली

ही मालिका गाजवली होती ती विरेंद्र सेहवागने. याच दौऱ्यामध्ये त्याने त्रिशतक ठोकले होते. 4 डावांमध्ये सेहवागने 109 च्या सरासरीने 438 धावा ठोकल्या होत्या. त्याखालोखाल सर्वाधिक धावा राहुल द्रविडने केल्या होत्या. राहुल द्रविडने या दौऱ्यातील कसोटी सामन्यांमध्ये 77 च्या सरासरीने 309 धावा केल्या होत्या. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास फिरकीपटू अनिल कुंबळे याने सर्वाधिक 15 बळी टीपले होते. त्याखालोखाल इरफान खानने आणि लक्ष्मीपती बालाजीने 12-12 बळी टीपले होते. शोएब अख्तर ज्या फलंदाजाला घाबरायचा, त्या फलंदाजाने या मालिकेतील कसोटी सामन्यांत 84 च्या सरासरीने तर एकदिवसीय सामन्यात 160 च्या सरासरीने धावा कुटल्या होत्या. 

Advertisement

नक्की वाचा : सिनेमा पाहात होतो त्यावेळी... श्रेयस अय्यरच्या खुलाशानंतर रोहित आणि गंभीरवर होतीय टीका!

प्रत्येक सामन्यातून उदयास आला नवा हिरो
नेटफ्लिक्सवरील मालिकेमध्ये क्रीडा पत्रकार अयाज मेमन यांनी बोलताना म्हटले आहे की या मालिकेतील प्रत्येक सामन्यातून एक नवा हिरो उदयास येताना पाहायला मिळाला. मग तो भारतीय संघाचा असो अथवा पाकिस्तानी संघाचा. दोन्ही संघांमध्ये झालेल्या 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये लाहोरमध्ये खेळवण्यात आलेला सामना हा दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. लाहोरला पोहोचण्याच्या आधी दोन्ही संघ प्रत्येकी 2 सामने जिंकला होता. अंतिम सामना जो जिंकेल तो मालिकाही जिंकणार होता. अखेरच्या सामन्यात सचिन आणि सेहवाग लवकर बाद झाले होते. त्यानंतर आलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कर्णधार सौरव गांगुली यांनी डाव सावरला होता. लक्ष्मणने 107 धावा केल्या होत्या तर गांगुलीने 45 धावा केल्या होत्या. मात्र खरी मजा ही नंतर आली होती. 

Advertisement

नक्की वाचा : राहुल द्रविडच्या कारला लोडिंग ऑटोची धडक, VIDEO व्हायरल

शोएब अख्तरने या सामन्याबद्दल बोलताना म्हटले की ""जिंकू अथवा हरू फरक पडत नव्हता, आम्ही आनंद लुटण्यासाठी खेळत होतो. आम्ही त्यांना मारू याची आम्ही खात्री केली होती." ज्या वेगाने शोएब बॉलिंग करत होता तो थक्क करणारा होता. लक्ष्मण आणि गांगुलीचा अडसर शोएबनेच दूर केला होता. भारतीय संघाने 293 धावा फलकावर लावल्या होत्या. 

Photo Credit: FB Page : lakshmipathybalajipriya

बॉल छातीवर बसला असता तर जागीच मेला असता!
या सामन्यामधून भारतीय संघाला नवा हिरो सापडला होता. त्या हिरोचं नाव होतं लक्ष्मीपती बालाजी. याच बालाजीने शोएब अख्तरला जाम त्रास दिला होता. बालाजीने या सामन्यात 6 बॉलमध्ये 10 धावा केल्या होत्या. त्यामध्ये एका षटकाराचा समावेश होता. हा सिक्स त्याने  शोएब अख्तरला मारला होता. त्याला आणखी धावा करता आल्या असत्या मात्र शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारण्याच्या नादात त्याची बॅट तुटली होती. शोएब अख्तरने बालाजीबद्दल बोलताना म्हटले की, "बालाजी हा माझ्यासाठी एक वाईट स्वप्न ठरला होता. मी त्याला बॉल टाकायचो तो त्यावर सिक्स मारत होता. मिस्टर बालाजी, तुला माहिती आहे ना की जगातील सगळ्यात मोठा वेगवान गोलंदाज आहे ते ! मी टाकलेल्या बॉलवर कोणी जोराने बॉल मारला आणि तो तुमच्या छातीवर लागला तर तुम्ही जागीच ठार व्हाल. मला सिक्स मारण्याच्या नादात त्याची बॅटही तुटली होती."

पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीही झाले बालाजीचे फॅन
बालाजी ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता आणि शोएबसारख्याला चोपून काढत होता ते पाहून पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीही त्याचे फॅन झाले होते.  बालाजी असं काही करेल हे लोकांच्या कल्पनेपलिकडील होतं. मात्र त्याने जेव्हा मारायला सुरूवात केली तेव्हा लोकं अक्षरक्ष: वेडी झाली होती. कारण शोएब अख्तरला अशा पद्धतीने कोणी सिक्स मारू शकत नव्हतं आणि तेही पाकिस्तानात. यामुळे मैदानातील पाकिस्तानी क्रिकेटरसिकांनीही बालाजीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. 

Photo Credit: FB Page : lakshmipathybalajipriya

बालाजी हसला, शोएब भडकला
भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन याने बालाजीने केलेल्या फटकेबाजीनंतर त्याला प्रश्न विचारला होता की,  "की तू हे केलंस तरी कसं ? त्याचे बॉल वेगात येत नव्हते का ? यावर बालाजीने त्याला सांगितलं की, अरे एकवेळ अशी आली होती की मला बॉलच दिसत नव्हता, मी लेग साईडला किंचित सरकून जोरात बॅट फिरवत होतो." सिक्स मारल्यानंतर बालाजी हसत होता आणि शोएब वैतागलेला दिसत होता. पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमी बालाजीची फलंदाजी पाहून शोएबऐवजी बालाजीला सपोर्ट करायला लागले होते. एखाद्या दांडगटाच्या डोळ्यात लहान मुलाने बोट घातल्यासारखा हा प्रकार होता असं क्रीडा पत्रकार अयाज मेमन यांनी सांगितलं. 

सेहवागने शोएबला चिडवलं, इंझमामही वैतागला
बालाजीने शोएब अख्तरला ज्या पद्धतीने चोपला ते पाहून विरेंद्र सेहवागसह भारतीय फलंदाजांनी शोएबला चिडवायला सुरुवात केली होती. " आमचा  11 व्या नंबरचा प्लेअरही तुला सिक्स मारतो, तू कसला वेगवान गोलंदाज आहेस ?" असं म्हणत शोएबला चिडवण्याच येऊ लागलं होतं. सेहवागने म्हटलं की, बालाजी इतकी जबरदस्त कामगिरी करेल याची कोणी कल्पना केली नव्हती. बालाजीने फक्त बॅटींग चांगली केली असं नाही, त्याने ब़लिंगही जबरदस्त केली होती. त्याच्याबद्दल बोलताना सौरव गांगुली याने म्हटलं की, "त्या दौऱ्यात सगळ्यात चांगली गोलंदाजी बालाजीने केली होती. त्याने सगळ्यात जास्त त्रास इंझमामला दिला होता.इंझमामने मला येऊ विचारलं होतं की याला कुठून आणलायस तू ? कोणता बॉल बाहेर जातोय, कोणता आत येतो हे कळतच नाही."
 

Topics mentioned in this article