बार्बाडोस ते चेन्नई, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटच्या मैदानावर दुसरा धक्का

भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात आफ्रिकेचा महिला संघ १० विकेटने पराभूत झाला आहे. दोन्ही डावांत मिळून १० विकेट घेणारी फिरकीपटू स्नेह राणा प्लेअर ऑफ द मॅच ठरली.

जाहिरात
Read Time: 3 mins
विजयी लक्ष्य पूर्ण केल्यानंतर आफ्रिकन खेळाडूंशी हस्तांदोलन करताना शफाली वर्मा (फोटो सौजन्य - BCCI Women)
चेन्नई:

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पुन्हा एकदा भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. बार्बाडोस येथे टी-२० विश्वचषकात पराभव पत्करावा लागल्यानंतर चेन्नईतही दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात आफ्रिकेचा महिला संघ १० विकेटने पराभूत झाला आहे. दोन्ही डावांत मिळून १० विकेट घेणारी फिरकीपटू स्नेह राणा प्लेअर ऑफ द मॅच ठरली.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना भारतीय महिलांनी सलामीवीर शफाली वर्माचं द्विशतक आणि स्मृती मंधानाचं शतक या जोरावर धावांचा डोंगर उभा केला. या दोघींनाही जेमिमा रॉड्रीग्ज, हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी उत्तम साथ दिली. ज्या जोरावर भारतीय महिलांनी पहिल्या डावात ६ विकेट गमावत ६०३ धावांचा डोंगर उभा केला. शफाली वर्माने २०५, स्मृती मंधानाने १४९, रिचा घोषने ८६, हरमनप्रीत कौरने ६९ तर जेमिमा रॉड्रीग्जने ५५ धावा केल्या. आफ्रिकेच्या गोलंदाज पहिल्या डावात हतबल ठरलेल्या दिसल्या.

प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेने पहिल्या डावात आश्वासक सुरुवात केली. कर्णधार लॉरा वॉल्वरडाट, एनेक बोश, सुने लुस आणि मारिझेन काप यांनी चांगली फलंदाजी केली. परंतु भारतीय गोलंदाजीसमोर त्या फारकाळ तग धरु शकल्या नाहीत. आघाडीच्या फळीतल्या या महत्वाच्या फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीत नादीन डी-क्लर्कने एकाकी झुंज दिली. ज्यामुळे पहिल्या डावात आफ्रिकेचा संघ २६६ धावांपर्यंत मजल मारु शकला. पहिल्या डावात टीम इंडियाकडून स्नेह राणाने ८ तर दिप्ती शर्माने २ विकेट घेतल्या.

Advertisement

यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. एनेक बोशला बाद करत भारतीय महिलांनी दुसऱ्या डावात आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. परंतु कर्णधार लॉरा वॉल्वकडाट आणि सुने लुस यांच्या शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकन महिलांनी भारताला चांगली झुंज दिली. या दोघींना मधल्या फळीत नादीन डी क्लर्कने अर्धशतक झळकावत भारताला चांगलंच झुंजवलं. कर्णधार लॉराने दुसऱ्या डावात १२२, सुने लुसने १०९ तर नादीन डी क्लर्कने ६१ धावा केल्या.

हे ही वाचा - T-20 WC BLOG : रोहित नावाचं इमोशन

ज्या जोरावर आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३७३ धावांपर्यंत मजल मारत भारतावर आघाडी घेतली. परंतु ही आघाडी ३६ धावांची नाममात्र ठरली. भारतीय महिलांकडून दुसऱ्या डावात स्नेह राणा, दिप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. त्यांना पुजा वस्त्रकार, शफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनी १-१ विकेट घेत चांगली साथ दिली.

Advertisement

हे ही वाचा - कुणाला रडू कोसळलं, तर कुणी निराश मैदानात बसलं; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे Photos

विजयासाठी ३७ धावांचं आव्हान मिळालेल्या भारतीय महिला संघाने आश्वासक सुरुवात केली. शुभा सथिश आणि शफाली वर्माने एकही विकेट न जाऊ देता हे आव्हान पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Advertisement