आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव सध्याच्या घडीला सौदी अरेबियाच्या जेद्दाह या शहरात सुरु आहे. प्रत्येक लिलावात कोणता खेळाडू महागडा ठरणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष असतं. यंदाच्या लिलावात पहिल्याच दिवशी संघमालकांनी पहिल्या तासांत 110 कोटी खर्च करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. तसेच यंदाच्या लिलावात गेल्या दोन वर्षांत गोलंदाजांची असलेली मक्तेदारी मोडून काढत फलंदाजांनी महागडा खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे.
गोलंदाजांना मागे टाकत फलंदाज ठरले वरचढ -
2023 साली पंजाब किंग्ज संघाने इंग्लंडचा डावखुरा गोलंदाज सॅम करनवर 18.50 कोटी मोजले होते. यानंतर मागच्या वर्षी झालेल्या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. सर्वात आधी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सवर हैदराबादने 20.50 कोटींची बोली लावली होती. हा विक्रम यानंतर पुढच्या काही तासांत मोडीत निघून मिचेल स्टार्क 24.75 कोटींच्या बोलीसह सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्कला विकत घेतलं होतं.
परंतु यंदाच्या लिलावात संघमालकांचा कल हा फलंदाजांकडे पहायला मिळाला. सर्वात आधी श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपये मोजले. यानंतर पुढच्या काही मिनीटांतच लखनऊ सुपरजाएंटने ऋषभ पंतवर 27 कोटींची बंपर बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. ज्यामुळे सर्वात महागडा खेळाडू बनण्याचा मान आता पंतच्या नावावर जमा झाला आहे.
पहिल्याच तासात संघमालकांनी पाण्यासारखा पैसा केला खर्च -
पहिल्याच संचातील खेळाडूंसाठी संघमालकांमध्ये चढाओढ पहायला मिळाली. पंत आणि अय्यरव्यतिरीक्त अर्शदीप सिंग, जोस बटलर, मिचेल स्टार्क आणि कगिसो रबाडा यांनाही चांगली बोली लागलेली पहायला मिळाली.
आतापर्यंत पार पडलेल्या लिलावावर भारतीय खेळाडूंचं वर्चस्व पहायला मिळत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लिलावात आता सरतेशेवटी कोणत्या खेळाडूचं भाग्य उजळतं की पहिल्याच तासात मिळालेले महागडे खेळाडू कायम राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.