T-20 WC BLOG : रोहित नावाचं इमोशन

अजुनही हिटमॅन वन-डे आणि कसोटी क्रिकेट खेळणार आहे. तोपर्यंत ज्या आठवणी त्याने दिल्यात त्या मनाच्या एका कप्प्यात ठेवून पुढच्या स्पर्धेची वाट पाहूयात...

जाहिरात
Read Time: 6 mins
विजयानंतर आनंद साजरा करताना रोहित आणि विराट (फोटो सौजन्य - ICC)
मुंबई:

रात्री उशीरा मॅच पाहून जवळपास मध्यरात्री घरी पोहचलो. सकाळी उठून परत ऑफिसला आलो. परंतु अजुनही एक मन हे मानायला तयार नाहीये की शनिवारी रात्री कॅरेबियन बेटांवर रोहित शर्मा नावाच्या एका माणसाने इतिहास घडवला आहे. तब्बल ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने ICC ट्रॉफी जिंकली आहे. ही ११ वर्ष भारतातल्या कोणत्याही क्रिकेट चाहत्यासाठी सोपी गेली नाहीत. प्रत्येक स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याची आशा आणि सरतेशेवटी मोक्याच्या क्षणी येऊन माती खाणं हा जणूकाही एकाप्रकारे शिरस्ताच बनला होता. परंतु या सर्व आशा-निराशेच्या खेळामध्ये एक मन कायम आशा ठेवून होतं, भारताने वर्ल्डकप जिंकायला हवा आणि बाकी कोणासाठी नाही तर किमान रोहित शर्मा या अवलियासाठी जिंकायला हवा. कोणी मानो अथवा न मानो...अस्सल मुंबईकर रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटसाठी एका प्रकारचं इमोशन बनला होता. बार्बाडोसमध्ये रोहितच्या नेतृत्वात भारताने वर्ल्डकप जिंकला...आणि अपेक्षेप्रमाणे रोहितने निवृत्तीची घोषणा केली.

अगदी मनापासून सांगतो विजयाचा आनंद साजरा करेपर्यंत रोहित शर्मा आता टी-२० क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही ही बातमी कानावर आली आणि काहीसा धक्का बसला. हे होणारचं होतं हे माहिती असतानाही ही भावनाच काहीशी पचनी पडत नाहीये. ९० च्या दशकात मोठे झालेल्या आम्हा भारतीय क्रिकेट चाहत्यांचा एका मोठा प्रॉब्लेम आहे. क्रिकेट हा भारतात एका धर्माप्रमाणे पाहिलं जात असलं तरीही आमच्या पिढीने क्रिकेटला आणि क्रिकेटपटूंना एक इमोशन म्हणून पाहिल आहे. आमच्यापर्यंत आतासाठी हे काम सचिन तेंडुलकरने केलं. सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग यासारख्या मंडळींनी केलं. या खेळाडूंना मैदानात पाहणं ही एक वेगळी पर्वणी होती. त्यांच्या चांगल्या-वाईट फॉर्मसह हे सर्व खेळाडू भारतीयांच्या गळ्यातले ताईत झाले होते. ही पिढी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर एखाद्या प्लेअरभोवती आपल्या भावना तयार होणं असं फार अभावाने झालं आहे. ही भावना तयार केली रोहित शर्माने...

२००७ च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रोहित शर्माने आपल्या कॅप्टन्सीचं स्किल आहे हे सर्वात आधी दाखवून दिलं ते IPL दरम्यान. परंतु धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाची कमान रोहितऐवजी विराट कोहलीकडे गेली. आपल्या कारकिर्दीत विराट कोहलीनेही कर्णधार या नात्याने प्रभावी कामगिरी केली. त्याला देखील आयसीसी ट्रॉफी जिंकायची चांगली संधी चालून आली परंतु काहीकेल्या ते गणित जुळून आलं नाही. नंतरचा काळ आला विराट आणि रोहितमधल्या सुप्त संघर्षाचा आणि भारतीय संघात नेतृत्वबदलाचा. विराट कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर बोरिवलीचा रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार बनला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा स्वतःचा एक चाहता वर्ग आहे. हा चाहता वर्ग तयार होण्याचं सर्वात महत्वाचं कारण मला वाटतं ते म्हणजे रोहित शर्मा हा आपल्यापैकी अनेकांना आपल्यातलाच वाटतो. सध्या इंटरनेटच्या जमान्यात सोशल मीडियावर अनेक छोटे-मोठे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात रोहित शर्माचा एक जुना व्हिडीओ काही दिवसांपूर्वी पहायला मिळाला त्यात स्वतःची ओळख करुन देताना रोहित म्हणतो...Hi My Name is Rohit and my Nickname is Shana (शाणा). आता हा शाणा हा शब्द अस्सल मुंबईच्या रस्त्यांवर तयार झालेला आहे. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक सोसायटीच्या टीममध्ये एक हरहुन्नरी खेळाडू असतो तो असाच शाणा असतो. अनेकांना ते रुचत नाही पण ज्यांना रुचत नाही त्यांनाही माहिती असतं की संकटकाळी हाच शाणा आपल्याला वाचवायला उभा राहणार आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माची कारकिर्दही मला अशीच काहीशी वाटते. भलेही कर्णधारपद हाती आल्यानंतर त्याच्याकडून धावा झाल्या नसतील. शतकं, द्विशतकं झळकावली गेली नसतील. परंतु एका संघाची मोट बांधून ठेवणं आणि मैदानावर त्यांना एकत्रितपणे नियंत्रीत करणं हे रोहितने अगदी बेमालूमपणे केलं.

Advertisement


रोहितचा मैदानातला वावरही अशाच टिपीकल शाणा कॅटेगरित मोडणारा होता. स्टम्प माईकमध्ये रोहित आपल्या सहकाऱ्यांना ज्या पद्धतीने शाब्दीक डोस देतो ते ऐकणं सगळ्यांनाच आवडतं. कोई भी गार्डन मे घुमेगा तो xxx दुंगा सबकी...हे रोहितचं गेल्या काही दिवसांमधलं गाजलेलं वाक्य. पुज्जी भाग भेंxx...हे आणखी एक गाजलेलं वाक्य. अनेकदा आपल्या सहकाऱ्यांना, ज्युनिअर खेळाडूंना समजावताना रोहितच्या तोंडातून सहज शिवी निघते. परंतु त्याच्या शिवीचं मैदानातला कोणताही खेळाडू वाईट वाटून घेत नाही. शिवी देणारी माणसं ही जगातली सर्वात साफ मनाची माणसं असतात असं माझं वैय्यक्तिक मत आहे. जे काही असेल चांगलं-वाईट ते आपल्या शिवीच्या माध्यमातून व्यक्त होतात. उगाच मनात आडपडदा ठेवून व्यक्त होणं त्यांना जमत नाही. अशीच माणसं एखादा संघ चांगला बांधू शकतात असं मला नेहमी वाटतं आलं आहे. टी-२० वर्ल्डकप जिंकून रोहितने हे सिद्ध करुन दाखवलं आहे.

अनेक मुलाखतींमध्ये भारतीय संघाचे खेळाडू रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचं कौतुक करताना पहायला मिळतात. प्रत्येक बॉलरला त्याच्या डोक्यात जी रणनिती ठरली असेल त्याप्रमाणे बॉलिंग करायला देणं...जर तो कुठे अडकत असेल तर त्याला मदत करणं. इंज्युअर्ड खेळाडूला इंज्युरीतून सावरण्यासाठी मार्गदर्शन करणं...कोणी ऐकत नसेल तर त्याला एक सणसणीत शिवी घालून समजावणं हे रोहितने अगदी आपल्या शैलीतून केलं...आणि त्याचं कोणीही वाईट वाटून घेतलं नाही. कारण त्यांच्याही मनात एक विश्वास तयार झाला होता की हा माणूस आता आपल्याला शिवी देत असला तरीही त्याच्या मनात काहीही नाही आणि तो जे बोलला ते आपल्या भल्यासाठीच बोलला.

Advertisement

हे सगळं तेव्हाच शक्य होतं जेव्हा एखादा खेळाडू आपलं स्टारडम बाजूला ठेवून आपला लोकल कनेक्ट कायम जोडून ठेवतो. आपल्या पर्सनल रेकॉर्डला बाजूला ठेवून संघाचा विचार पहिले करतो. २०२३ चा वन-डे वर्ल्डकप आठवून पहा...रोहितने सुरुवातीच्या सामन्यापासून ज्या पद्धतीने आक्रमक फटकेबाजी केली ती वाखणण्याजोगी होती. त्याच्या याच खेळीचा भारताला फायदा झाला. या खेळीदरम्यान त्याने आपल्या शतकाचा विचार कधीही केला नाही. फक्त संघाला चांगली सुरुवात करुन देणं हा एकमेव उद्देश त्यामागे होता. ही रणनिती मोक्याच्या क्षणी टीम इंडियावर उलटलीही परंतु रोहित यानंतरही आपल्या खेळीवर कायम राहिला. सध्याच्या जगात जिथे पर्सनल रेकॉर्डला जास्त महत्व दिलं जातं तिकडे रोहितसारखा एखादा खेळाडू तयार होणं ही खरंतर विरळच गोष्ट आहे.

रोहितच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये हे प्रकर्षाने जाणवत होतं की त्याला टीम इंडियासाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे. अनेकदा अपेक्षेप्रमाणे निकाल येत नसेल तर नेतृत्वबदल केलं जातं. परंतु यंदा BCCI ने असं कोणतही पाऊल न उचलता, वन-डे वर्ल्डकप गमावल्यानंतरही रोहितकडे नेतृत्व कायम ठेवलं. त्याचा परिपाक या स्पर्धेत दिसून आला. अगदी संघनिवडीपासून ते प्लेईंग ११ मध्ये फारसे बदल न करण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत रोहित शर्माने आपली चुणूक दाखवून दिली. स्पर्धेला निघण्याआधी रोहितला संघात ४ स्पिनर्स का निवडले असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर व्यक्त होताना रोहितने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वेस्ट इंडिजमध्ये देईन असं सांगितलं. सुरुवातीला अमेरिकेत झालेल्या सामन्यात प्लेईंग ११ मध्ये खेळपट्टी पाहून सिराजला संधी आणि त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये स्पर्धा सुरु झाली तेव्हा सिराजच्या जागेवर कुलदीपला संधी. जणुकाही प्रत्येक चाल रोहितच्या डोक्यात ठरलेली होती...आणि महत्वाची बाब म्हणजे रोहित आपल्या या रणनितीवर ठाम राहिला आणि त्याने जगाला दाखवून दिलं की या कारणासाठी मी ४ स्पिनर्स भारतीय संघात ठेवले आहेत. अक्षर पटेल, कुलदीप यादव या स्पिनर्सनी महत्वाच्या सामन्यांमध्ये मोक्याच्या क्षणी भारतीय संघासाठी जे योगदान दिलंय त्याला तर काही तोडच नाही. परंतु यामागे कर्णधार म्हणून रोहितचाही तितकाच मोठा हात आहे.

Advertisement

हार्दिक पांड्या टाकत असलेल्या अखेरच्या षटकात पाचव्या चेंडूवर विकेट गेली आणि अखेरच्या बॉलवर एक धाव आली आणि रोहित शर्मा थेट बार्बाडोसच्या मैदानावर झोपला. आपला चेहरा खाली करुन कदाचीत त्या क्षणांमध्ये त्याने रडून घेतलं असेल...जे स्वप्न आपण पाहिलं होतं ते पूर्ण केल्याची भावना ही काही औरच असते. वेस्ट इंडिजच्या मातीत भारताचा तिरंगा रोवणं, हात जोडून प्रेक्षकांना अभिवादन करणं, विराटची गळाभेट घेणं आणि जाता जाता अलगदच सांगून जाणं की आता मी थांबतो...पुढच्या पिढीने जबाबदारी घ्या. कोणत्याही कर्णधाराला स्वप्नवत वाटेल अशी कारकिर्द रोहित शर्माची टी-२० क्रिकेटमध्ये राहिली आहे. यापुढे तो भारतीय संघाकडून टी-२० क्रिकेट खेळताना दिसणार नाही. त्याचा पूल शॉट, उत्तुंग सिक्स. आपल्याच खेळाडूंना शिव्या देऊन पण तितक्याच प्रेमाने खडसावणं हे सगळं काही आता मैदानावर दिसणार नाही. काहीकाळ जाईल...नवीन पिढीत नवीन नेतृत्व तयार होईल...पण ज्याच्याभोवती आपल्या भावनांचं जाळ तयार होईल असा रोहित शर्मासारखा खेळाडू तयार होणं आतातरी कठीण वाटतंय. पण असो, तो पुढचा मुद्दा राहिला. अजुनही हिटमॅन वन-डे आणि कसोटी क्रिकेट खेळणार आहे. तोपर्यंत ज्या आठवणी त्याने दिल्यात त्या मनाच्या एका कप्प्यात ठेवून पुढच्या स्पर्धेची वाट पाहूयात...जेव्हा रोहित मैदानात येईल आणि आपल्या सहकाऱ्यांना बोलेल...कोई भी गार्डन मे घुमेगा तो....