योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोल्यात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. 19 मार्चपासून बेपत्ता असलेल्या अकरा वर्षीय सर्वज्ञ निंबाळकर या बालकाचा मृतदेह आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील एका नाल्यात आढळून आला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना त्या परिसरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं जाणवले. त्यांनी नाल्याजवळ जाऊन पाहिले असता एका लहान मुलाचा मृतदेह दिसून आला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
19 मार्चपासून होता बेपत्ता नेमकी काय आहे घटना..
यादरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सर्वज्ञ निंबाळकर हा 19 मार्च रोजी घरातील कोणालाही न सांगता घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. सर्वज्ञला पोहोण्याची आवड असल्यामुळे बचाव पथकाच्या मदतीने परिसरातील एका विहिरीतही त्याचा शोध घेण्यात आला होता. मात्र तेथेही तो आढळून आला नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता अधिक वाढली होती. अखेर आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृतदेह आढळला नाल्यात...
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं, हा अपघात आहे की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या संदर्भात पोलीस अधिकारी ईशानी आनंद यांनी सांगितलं की, मृतदेह नाल्यात आढळून आला असून सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे अकोला शहरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.