Navi Mumbai Crime : नवी मुंबईत मित्राच्या लग्नासाठी आलेल्या स्वीडिश तरुणाचा धक्कादायकरित्या मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हा तरुण अवघ्या २५ वर्षांचा होता. या तरुणाच्या मृत्यूने लग्नघरात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवारी वाशीतील रघुलीला मॉलमध्ये लग्नसमारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी नवरदेवाचा स्वीडनमधील स्टॉकहोममध्ये राहणारा मित्र एल्डे एडवर्ड मुंबईत आला होता. त्या दिवशी लग्न लागेपर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं. लग्नानंतर एडवर्ड काही मित्रांसोबत बाहेर गेला आणि त्यानंतर गायब झाला.
रविवारी सायंकाळी एडवर्डचा मित्र प्रणय शाह याला एल्डे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली. एडवर्डला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर शाहने सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्डे सानपाड्यातील एका बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडला. ज्यानंतर तो गंभीर जखमी झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, तो आधी इमारतीच्या गेटवरुन उडी मारून गेला. यादरम्यान तो चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळला. तो दारुच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोस्टमार्टमनंतर नेमकी माहिती समोर येईल.
नक्की वाचा - Pune News : शिवरायांच्या सिंहगडावर संतापजनक कृत्य; गाडीच्या तपासणीदरम्यान आढळलं...
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नवी मुंबई पोलिसांनी एल्डेच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी अधिकृत चॅनलच्या माध्यमातून स्वीडिश एम्बसीशी संपर्क केला आहे.