मुंबईत (Mumbai News) चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या 26 वर्षीय तरुणाने सहार पोलीस स्टेशनच्या (Sahar Police Station) लॉकअपमध्ये कथितपणे आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या आरोपीचं नाव अंकित राय आहे. अंकित एअरपोर्ट भागातील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करीत होता. तो आपल्या चार ते पाच मित्रांसह भाड्याच्या घरात राहत होता. अंकितला सहार पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केलं होतं आणि कोर्टात सादरही करण्यात आलं होतं. कोर्टाने 9 जुलैपर्यंत त्याला पोलीस कस्टडीत पाठवलं होतं. त्याने लॉकअपमध्ये शौचालयात गळफास घेत आत्महत्या केली. मुंबई क्राइम ब्रांच या प्रकरणात तपास करीत आहे.
रूममेटचा मोबाइल चोरण्याचा आरोप...
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकितने कथितपणे आपल्या रूममेटचा मोबाइल चोरी केला होता. नुकतेच पाच हँडसेट हरवल्याची सूचना मिळाली होती आणि तपासादरम्यान तीन मोबाइल अंकितजवळ आढळून आले होते. ज्यानंतर चोरीच्या आरोपाखील त्याला सहार पोलिसांनी अटक केली.
नक्की वाचा - Juvenile Detention Centre : छत्रपती संभाजीनगरमधील बालसुधारगृहातून का गायब होत आहेत मुली? धक्कादायक कारण आलं समोर
अंकितने गमछ्याने घेतला गळफास..
पोलिसांच्या ताब्यात असताना अंकित मृत आढळून आला आहे. त्याने गमछ्याने स्वत:ला गळफास घेतल्याची माहिती आहे. मात्र लॉकअपमध्ये गमछा कसा पोहोचला असा सवाल उपस्थित केला जात आहे. नियमांनुसार, तुरुंगात कोणतीही खासगी वस्तू ठेवण्याची परवानगी नसते. अशात त्याला गमछा कसा मिळाला असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या सुरुवातीच्या जबाबातून असे दिसून आले आहे की, चोरीच्या आरोपांमुळे आणि अटकेमुळे अंकित गंभीर मानसिक तणावाखाली होता. त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले असावे असा संशय आहे. आता या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून केला जात आहे.