
'मला माफ करा बाबा! मला हे आयुष्य आवडत नाही, मी आता आणखी जगू शकत नाही, मी चालले आहे...' कोणत्याही बापासाठी मुलगी म्हणजे जीव की प्राण असते. तो तिला धीर देतो, तिच्या आत्मसन्मानाचे महत्त्व समजावतो. तिनं भविष्यात आत्मविश्वासाने आयुष्य जगावं यासाठी तो धडपडत असतो. पण रिधान्याच्या वडिलांना त्यांच्याच मुलीने मरण्यापूर्वी आयुष्याचे सत्य सांगितले, तेव्हा ते पूर्णपणे खचले. तामिळनाडूच्या तिरुपूरमध्ये हुंड्यामुळे 27 वर्षांच्या रिधान्याने आत्महत्या केली. विशेष म्हणजे, तिच्या वडिलांनी हुंड्यात मोठ्या प्रमाणात सोने आणि एक लक्झरी कार दिली असतानाही ही घटना घडली आहे.
सासरचे करत होते छळ
तामिळनाडूच्या तिरुपूरमध्ये हुंड्यावरून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून रिधान्याने आत्महत्या केली. या प्रकरणात तिच्या पतीला आणि सासरच्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. रिधान्या एका गारमेंट मॅन्युफॅक्चरर अन्नादुरई यांची मुलगी होती. या वर्षी एप्रिलमध्येच तिचे लग्न 28 वर्षांच्या कविन कुमारसोबत झाले होते. 'इंडियन एक्सप्रेस'ने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार , रिधान्याच्या वडिलांनी हुंड्यात 500 सोन्याची नाणी आणि 70 लाख रुपयांची एक लक्झरी कार देण्याचे वचन दिले, तेव्हाच हे नाते निश्चित झाले. लग्नादरम्यान केवळ 300 नाणी देण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित 200 नाण्यांसाठी तिचा छळ सुरु होता.
( नक्की वाचा : Nalasopara : 32 लाखांच्या बदल्यात घेतले 4 फ्लॅट, पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरचा टोकाचा निर्णय )
कारमध्ये दिला जीव
शनिवारी रिधान्या तिच्या सासरहून 'मी मोंडिपलायम मंदिरात जात आहे' असे सांगून निघाली. अनेक तासांनंतर पोलिसांना परिसरात उभ्या असलेल्या एका कारबद्दल माहिती मिळाली. आतमध्ये त्यांना रिधान्या बेशुद्ध अवस्थेत सापडली, तिच्या तोंडातून फेस येत होता. तिने कीटकनाशकाच्या गोळ्या खाल्ल्या असल्याचे सांगितले जात आहे. तिचा मृतदेह अविनाशी येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आणि रविवारी शवविच्छेदनानंतर कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला.
वडिलांना पाठवला मेसेज
मृत्यूच्या काही वेळापूर्वी तिने वडिलांना सात व्हॉट्सॲप व्हॉईस मेसेजेस पाठवले होते. यात रिधान्याने तिला काय सहन करावे लागले, हे सविस्तरपणे सांगितले. तिने पती आणि त्याच्या आई-वडिलांवर रोज मानसिक त्रास दिल्याचा आणि कविनवर तिच्याशी मारामारी केल्याचा आरोप केला.
एका मेसेजमध्ये तिने म्हटले होते, 'मला हे आयुष्य आवडत नाही. मी आता आणखी जिवंत राहू शकत नाही. तुम्ही आणि आईच माझे जग आहात. मला माफ करा, बाबा, सर्व काही संपले आहे. मी चालले आहे.'
रिधान्याचे वडील अन्नादुरई यांनी सांगितलं की, ती लग्नाच्या 15 दिवसांनीच घरी परतली होती. ती खूप दुःखी व त्रस्त होती. ते म्हणाले, "मी तिला 'ॲडजस्ट' करायला सांगितले. तेव्हा मला माहित नव्हते की हे इतके वाईट असेल." त्यांनी सांगितले की, रिधान्याच्या वारंवार विनंतीनंतर, तिच्या सासूने तिची भेट घेतली आणि माफी मागितली, पण परिस्थिती बदलली नाही. अन्नादुरई म्हणाले की, जेव्हा ती पुन्हा परतली, तोपर्यंत 'ती पूर्णपणे खचली होती.'
( नक्की वाचा : Navi Mumbai: भर दिवसा महिलेचा पाठलाग, जबरदस्तीनं कारमध्ये बसवले.... नवी मुंबई हादरली! )
100 कोटींची मागणी
रिधान्याच्या सासरच्यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केली होती, असे अन्नादुरईने सांगितले. चेयूर पोलिसांनी या प्रकरणात कविन कुमार आणि त्याचे आई-वडील, ईश्वरमूर्ती आणि चित्रादेवी यांना हुंडा छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world