योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News : अकोला शहरातून तीन अल्पवयीन मुले सोमवारी रात्रीपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. आशिष सतीश मुरई, आदित्य सदानंद सुगंधी आणि दर्शन राजू रंधिरे तिघेही १५ वर्षांचे आणि एकमेकांचे मित्र आहेत. सोमवारी सायंकाळी हे तिघेही घराबाहेर पडले परंतु रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडली. नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांकडे विचारपूस केल्यानंतरही त्यांचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने अखेर उशिरा रात्री पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. या घटनेने परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांची तपास आणि शोधमोहीम सुरू...
दरम्यान अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. मुलांचे मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज तसेच त्यांच्या मित्रपरिवाराची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी तिन्ही मुलांची शेवटची हालचाल नेमकी कुठे होती, याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, तसेच जवळच्या बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात शोधमोहीम वाढवण्यात आली आहे. अद्याप मुलं स्वतःहून कुठे निघून गेली की कोणत्या अडचणीत आली, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी विविध पथके तयार करून शोध कारवाईला गती दिली आहे. मात्र या रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तीन मुलांमुळे अकोल्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
कुटुंबीयांचे आवाहन; नागरिकांमध्ये चिंता
मुलांचा काही पत्ता न लागल्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण आहे. त्यांनी सर्व नागरिकांना सहकार्याची विनंती करत मुलांचे फोटो व माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. तिन्ही मुलांचे वय केवळ १५ वर्षे असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता अधिक वाढली आहे. वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्येही प्रचंड चर्चा रंगल्या आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून मुलांच्या लवकरात लवकर शोध लागावा, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे.