मनोज सातवी, प्रतिनिधी
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. ED ने समन्स बजावून अनिलकुमार आणि त्यांच्या पत्नीला आज (5 ऑगस्ट) चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितले आहे.
9 तासांहून अधिकवेळ चालली चौकशी...
काल 4 ऑगस्ट रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अनिलकुमार पवार आणि त्यांची पत्नी भारती पवार हे ईडीच्या वरळी येथील कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर रात्री साडे आठ वाजता अनिल कुमार आणि त्यांच्या पत्नी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. त्यामुळे आज अनिलकुमार पवार आणि त्यांच्या पत्नीची ईडीकडून तब्बल 9 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. तसेच, आज देखील त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
नक्की वाचा - खैर तस्करीचे सत्र सुरूच; वनविभागाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मोठी तस्करी उधळली
या प्रकरणात अनिल पवार आणि त्यांच्या पत्नीसह आणखी चार जणांनाही समन्स बजावण्यात आले असून येत्या आठवड्यात त्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहताच दार बंद केलं...
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर काही दिवसांपूर्वी ED ची कारवाई झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहताच अनिल कुमार पवार यांनी दरवाजा बंद ठेवून महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला जात आहे. पवार यांनी महत्त्वाचे कागदपत्रं आणि रोख रक्कम नष्ट करून फ्लश केल्याची सूत्रांची माहिती आहे. ईडीच्या छाप्यात पवार यांच्याकडे कोणतं घबाड सापडतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.