निकालानंतर नगरमध्ये राडा, खासदार निलेश लंकेंच्या PA वर जीवघेणा हल्ला!

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या P. A. वर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. ( फोटो सौजन्य @supriya_sule )
अहमदनगर:

लोकसभा निवडणुकीनंतर अहमदनगरमध्ये वातावरण तापलंय.  अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. झावरे यांच्य गाडीचीही तोडफोड करण्यात आलीय. या हल्ल्यात झावरे जखणी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

या प्रकरणात पारनेर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलंय. यामध्ये विजय औटी, नंदू औटी आणि आणखी एकाचा समावेश आहे. हे हल्लेखोर सुजय विखे पाटील समर्थक असल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. 

( नक्की वाचा : अजित पवारांना काय सल्ला देणार? बारामती जिंकताच सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर )

'नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे समर्थक ॲड राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे सांगणारी ही घटना आहे. गृहखात्याने या घटनेची तातडीने दखल घ्यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन महाराष्ट्राचा राजकीय व सामाजिक सलोख्याचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या या प्रवृत्तींना कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करावे. आम्ही सर्वजण या घटनेचा कठोर शब्दांमध्ये निषेध करीत आहोत. या प्रसंगी आम्ही सर्वजण ॲड झावरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत.' अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर पोस्ट केलीय.

अहमदनगर दक्षिणमधील निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंके यांनी भाजपाच्या सुजय विखे पाटील यांचा 28929 मतांनी पराभव केला. 

Advertisement
Topics mentioned in this article